नगरविकास राज्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय होणार
By admin | Published: June 9, 2015 01:16 AM2015-06-09T01:16:38+5:302015-06-09T01:17:10+5:30
उपमहापौर : महापौरांच्या ठरावावर उद्या सुनावणी
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणावरून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत उद्या, बुधवारी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी महापौरांसह पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सुनावणी अंतिम असल्याचे उपमहापौर मोहन गोंजारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
माळवींचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत शिफारस करण्यासाठी कोल्हापूर महापालिका सभागृहाने ठराव २० एप्रिलला पाठविला. सभागृहाची मागणी व अभियोग प्रस्तावानुसार ‘नगरसेवकपद रद्द का करू नये’, अशी नोटीस माळवींना मंत्रालयाने ८ मे रोजी बजावली. त्यांनी १८ मे रोजी लेखी खुलासा केला आहे.