शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या अंतिम मुलाखती पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:42 AM2020-10-06T10:42:04+5:302020-10-06T10:44:39+5:30
Shivaji University, kolhapur news, Vice Chancellor शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. कुलगुरूपदी निवड झालेल्या अंतिम उमेदवाराचे नाव आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. कुलगुरूपदी निवड झालेल्या अंतिम उमेदवाराचे नाव आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजचे (एनएमआयएमएस) विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. नितीन देसाई, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. के. व्ही. काळे, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आणि रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. अविनाश कुंभार यांच्या मुलाखती झाल्या.
या उमेदवारांमधून एकाची पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरूपदावर निवड होणार आहे. अंतिम मुलाखती झाल्याने यापदावर कोणाची निवड होणार याची उत्सुकता विद्यापीठातील घटकांना लागली आहे.
अशी झाली मुलाखतीची प्रक्रिया
उमेदवारांच्या आडनावांमधील आद्याक्षरांनुसार मुलाखतीचा क्रम निश्चित करण्यात आला होता. सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेमध्ये कुलपतींनी मुलाखती घेतल्या. प्रत्येक उमेदवारांसाठी १५ ते २० मिनिटांची वेळ देण्यात आली होती.
मुलाखतीमध्ये विद्यापीठाच्या विकासाचे व्हीजन, भविष्यकालीन योजना, विद्यापीठ कार्यक्षेत्राची माहिती, आदींबाबत कुलपतींनी या उमेदवारांशी संवाद साधला. मुलाखती समाधानकारकपणे झाल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.