विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 05:46 PM2019-09-03T17:46:09+5:302019-09-03T17:47:38+5:30
कोल्हापूर येथील विमानतळावरील एक महत्त्वाची सुविधा असणाऱ्या नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथील विमानसेवेला अधिक गती मिळणार आहे. कोल्हापूर विमानतळ येथून तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर : येथील विमानतळावरील एक महत्त्वाची सुविधा असणाऱ्या नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथील विमानसेवेला अधिक गती मिळणार आहे.
कोल्हापूर विमानतळ येथून तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सध्याची धावपट्टी ९७० मीटरने वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. विमानतळ विकास आराखड्यातील संरक्षक भिंतीचे ६५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एटीआर इमारतीचे काम सध्या सुरू आहे.
धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या सुविधेचे काम पूर्ण झाल्यानंतर परवान्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ‘डीजीसीए’च्या पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित परवाना मिळणार आहे. नाईट लँडिंग सुविधा विमानसेवा आणि विमानतळाच्या विकासाला गती देणारी ठरणार आहे.
या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित काम पूर्ण होईल, असे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सोमवारी सांगितले.
अबस्ट्रॅकल लाईट लावण्याचे काम
विमानाच्या उड्डाण क्षेत्रामध्ये अडथळे ठरत असलेल्या मोबाईल टॉवर, इमारतींवर अबस्ट्रॅकल लाईट लावण्यात येत आहेत. झाडांची उंची कमी करण्यात आली आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला असलेल्या भूमिगत दिव्यांचे काम सध्या करण्यात येत असल्याचे कटारिया यांनी सांगितले.