अंतिम याद्या ‘वेबसाईट’वर
By admin | Published: October 4, 2015 01:13 AM2015-10-04T01:13:37+5:302015-10-04T01:13:37+5:30
छापील याद्यांबाबत संभ्रम : प्रशासनाचा सावळागोंधळ कायम
कोल्हापूर : शहरातील प्रभाग निश्चिती, आरक्षण टाकण्याबरोबरच प्रारूप याद्या तयार करताना प्रशासनाकडून झालेल्या गंभीर चुका लक्षात घेऊन, अंतिम मतदार याद्या तयार करताना तरी डोळ्यांत तेल घालून काम केले जाईल, असे वाटत असताना अद्याप निवडणूक यंत्रणेत सावळागोंधळ कायम असल्याचे शनिवारी पुन्हा स्पष्ट झाले. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची वेळ टळून गेली तरी त्या प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत. सायंकाळी काही प्रभागांच्या याद्या महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत असून, त्यासाठीच्या ८१ प्रभागांतील अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत शनिवारपर्यंत होती; परंतु राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मुदतीत या याद्या पूर्ण करण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आले. प्रारूप याद्या करण्यात झालेल्या गंभीर चुका आणि त्या दुरुस्त करण्यासाठी दिलेला कमी कालावधी यांमुळे याद्यांची दुरुस्ती वेळेत झाली नाही. शुक्रवारी (दि. २) सकाळी सुरू झालेले याद्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी आटोपले. त्यानंतर त्या आॅनलाईनद्वारे निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्या. आयोगाकडूनही याद्यांत पुन:पुन्हा चुका दाखविण्यात येत होत्या. त्यामुळे शनिवारचा दिवसही याद्या दुरुस्तीत खर्ची पडला.
राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त सणस हे मुंबईत बसून, तर आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी वरिष्ठ अधिकारी हाताखालील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांसोबत कोल्हापुरात बसून आॅनलाईन याद्या दुरुस्तीचे काम करीत राहिले. शुक्रवारची संपूर्ण रात्र याद्या दुरुस्तीमध्ये गेली. प्रारूप याद्या तयार करताना चुकाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यास याद्यांवर काम करावे लागणे ही महानगरपालिका प्रशासनाची नामुष्की असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये तयार झाली आहे. शनिवारी हे काम नक्की कधी पूर्ण होणार, छापील
याद्या कधी मिळणार आणि तयार होणाऱ्या पक्क्या याद्या निर्दोष असतील का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारीही महापालिका अधिकाऱ्यांकडे नव्हते.
कोणीही याबाबत स्पष्ट माहिती द्यायला तयार नव्हते. काही अधिकारी फक्त महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर याद्या प्रसिद्ध केल्या असल्याचे सांगत होते.
याद्या छापण्यास देण्यात आल्या असून त्या रविवारी मिळतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे पक्क्या याद्यांबाबत संभ्रमावस्था कायम होती.
दोन अधिकारी रुग्णालयात
प्रारूप मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या कामात गेल्या
आठ-दहा दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. कामाचा व्याप आणि वेळेचे बंधन लक्षात घेऊन हे काम रात्रंदिवस सुरू आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना त्रास होऊ लागल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शनिवारी कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांनाही प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले.
दोन हजार कर्मचारी
शहरात जवळपास ४०० ते ४२५ मतदान केंदे्र स्थापन केली जाणार आहेत. त्यांवर प्रत्येकी पाच याप्रमाणे दोन हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे सर्व कर्मचारी विविध सरकारी खात्यांतून घेण्यात आले आहेत.