पॅकर्सच्या दोन संघातच आज अंतिम लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:29+5:302021-02-27T04:31:29+5:30
कोल्हापूर : पॅकर्स क्रिकेट क्लब फाउंडेशनने शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचा, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पॅकर्स क्रिकेट क्लब (ब) ने ...
कोल्हापूर : पॅकर्स क्रिकेट क्लब फाउंडेशनने शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचा, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पॅकर्स क्रिकेट क्लब (ब) ने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा पराभव करीत केडीसीए क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरी गाठली. आज, शनिवारी या दोन संघांत अंतिम सामना रंगणार आहे.
राजाराम काॅलेज मैदानावर शुक्रवारी सकाळी पॅकर्स क्रिकेट क्लब फाउंडेशन व शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना विद्यापीठ संघाने २० षटकांत ६ बाद १०६ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स फाउंडेशनने हे आव्हान १७.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा करीत पार केले.
दुसऱ्या सामन्यांत पॅकर्स क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १५० धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना मालती पाटील संघास हे आव्हान पेलवले नाही. पॅकर्स क्रिकेट क्लबच्या आदित्य पिसाळ व कार्तिक पाटील यांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांच्या संघाचा टिकाव लागला नाही. पाटील संघ २० षटकांत ९ बाद ७८ धावांत गुंडाळला. यात रोहित माणगावकर याने २८ व कपिल सांगावकर याने २६ धावा करीत झुंज दिली. मात्र, ते पराभवापासून संघाला वाचवू शकले नाहीत. आज शनिवारी या दोन विजयी संघात अंतिम लढत होणार आहे.