साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
By Admin | Published: February 12, 2015 11:37 PM2015-02-12T23:37:39+5:302015-02-13T00:57:01+5:30
‘दत्त-आसुर्ले’ उताऱ्यात, तर ‘जवाहर’ गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात २० लाख टन, सांगली जिल्ह्यात १५ लाख टन ऊस शिल्लक
प्रकाश पाटील- कोपार्डे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर व सांगली) ३७ साखर कारखान्यांनी आजअखेर एक कोटी ३१ लाख ३६ हजार ६१८ मे. टन उसाचे गाळप करून १२.२१ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी ६० लाख ३८ हजार १०५ क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आले असून, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख टन, असे ३५ लाख टन उसाचे क्षेत्र गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज आहे.साखरेचे दर घसरल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी एफआरपी एवढा दर देणेही कठीण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊसदराचा रेटा लावून धरला, तर गाळप हंगाम लांबणार म्हणून एक पाऊल मागे येत संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतील २७०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करा व कारखाने सुरू करा, असा अल्टीमेटम दिला. यातही थोडी सूट देत एफआरपीप्रमाणे दर द्या, असे जाहीर केले.
यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी १२.३४ या राज्यातील उच्चांकी उताऱ्यासह ८५ लाख ५७ हजार ९४१ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी पाच लाख ६२ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया-आसुर्ले साखर कारखान्याने सरासरी साखर उताऱ्यात १२.८८ टक्के उतारा मिळवत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे, तर जवाहर कारखान्याने ८ लाख ७२ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.
सांगली जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, आजअखेर येथे ११.८९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ४८ लाख ४० हजार १५२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ५७ लाख ५६ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील सर्वोदय रा. बा. पाटील साखर कारखान्याने १२.८१ सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर विभागात उताऱ्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही २० लाख मे. टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा हंगाम सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.
शेतकरी आर्थिक अडचणीत
जिल्ह्यातील दत्त-दालमिया वगळता इतर सर्वच कारखाने उसाचे बिलिंग करताना ढेपाळले आहेत. साखरेचे दर पडल्याने सर्वच कारखाने डिसेंबर अखेरपर्यंतच उसाचे पेमेंट करू शकले आहेत. यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दत्त-दालमिया साखर कारखान्याने दर १५ दिवसांचे उसाचे बिलिंग करण्याचा आपला वायदा पाळला आहे.
गाळप (लाख मे. टन) प्रथम तीन कारखाने
जवाहर, कोल्हापूर - ८,७२,९००
वारणा, कोल्हापूर - ८,३५,५००
दत्त-शिरोळ, कोल्हापूर - ७,०३,१०१.
विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखाने
दत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्के
सर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्के
गुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्के
रा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के
विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखाने
दत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्के
सर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्के
गुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्के
रा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के