अंतिम दर हिशोबात कारखानदारांची मखलाशी
By admin | Published: June 10, 2017 05:47 PM2017-06-10T17:47:20+5:302017-06-10T17:47:20+5:30
‘अंकुश’चा आरोप : बगॅस विक्रीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळावी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : ऊस दर नियंत्रण समितीपुढे आर्थिक वर्षातील हिशोब ठेवताना साखर कारखानदार मखलाशी करीत असून, त्यातूनही शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. यावर्षी चुकीचा हिशोब देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऊस दर नियंत्रण समितीकडे करणार असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
रंगराजन समितीच्या शिफारसीप्रमाणे उसाचा अंतिम दर निश्चित केला जातो. एकूण उत्पन्नातील ७० टक्केवाटा शेतकऱ्यांना, तर ३० टक्के कारखाना प्रशासनासाठी वापरला जातो; पण रंगराजन यांनी शिफारस करताना सरासरी १०.३० टक्केउतारा गृहित धरून हा फॉर्मुला निश्चित केला आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करायचा झाल्यास सरासरी १२.६० टक्के उतारा असल्याने येथे कारखानदारांनी ८०:२० फॉर्मुल्यानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण बगॅसची रक्कम देणे बंधनकारक आहे. मागील वर्षाचे ऊस दर नियंत्रण समितीला दिलेले हिशोब चुकीचे होते. साखर व मळीवरील अबकारी कर शेतकऱ्यांच्या हिश्श्यातून वसूल केला आहे. काही कारखाने अंदाजे आकडेवारी देऊन समितीबरोबरच शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, अशी फसगत यावर्षी कोणी केली तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऊस दर नियंत्रण समितीकडे करणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.
कारखान्यांच्या माहितीमध्ये त्रुटी
साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे महसुली उत्पन्नाच्या आधारे ऊस दर निश्चित करण्यासाठी सादर केलेल्या माहितीत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. अचूक माहिती कार्यालयास सादर करण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.
साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार टनाचा हिशोब -
साखर-सरासरी १२.६० टक्के उतारा व प्रतिक्विंटल ३५०० रुपये दरानुसार = ४४१० रुपये
मळी - टनाला ४० किलो व दर प्रतिकिलो ६ रुपये = २४० रुपये
बगॅस - वीज प्रकल्प असलेल्या कारखान्यांचे उत्पन्न = ११२ रुपये
प्रेसमढ - टनाला ४० किलो प्रेसमढ व दर ४०० रुपये प्रतिटन = १६ रुपये
टनापासून एकूण उत्पन्न = ४७७८
पैकी ७० टक्केशेतकऱ्यांचा वाटा = ३३४४ रुपये
ऊस तोडणी-वाहतूक = ६०० रुपये
अंतिम दर - २७४४ रुपये