इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

By admin | Published: June 24, 2016 12:22 AM2016-06-24T00:22:55+5:302016-06-24T00:47:48+5:30

दोन महिन्यांत काम सुरू : ७१ कोटींच्या योजनेचा ‘अमृत’मध्ये समावेश; सुरेश हाळवणकर यांची माहिती

Final recognition of Ichalkaranji Varna plan | इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

Next

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी योजनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी अंतिम मान्यता दिली. या योजनेला प्रत्यक्षात येत्या दोन महिन्यांमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.
सद्य:स्थितीस शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा केला जातो. पंचगंगा नदीतील प्रदूषण आणि उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरास पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम म्हणून पाच दिवसांतून एक वेळ पाण्याचा पुरवठा होतो. अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना राबविण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनास दिला. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना १९.५ किलोमीटर लांबीची असून, नदीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा साठा राहावा, यासाठी नदीपात्रात दोन कोटी रुपये खर्चून बंधारा बांधण्यात येणार आहे. नव्या वारणा योजनेसाठी सन २०४९ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्याची क्षमता या प्रकल्पात ठेवण्यात आली आहे.
वारणा नळ योजनेबाबत सांगताना आमदार हाळवणकर म्हणाले, या योजनेचा अमृत सिटी आराखड्यामध्ये मागील वर्षी समावेश करण्यात आला. तसेच अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याकरिता कमी कालावधी शिल्लक असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद म्हैसकर यांचे सहकार्य लाभले. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेबाबत दानोळी परिसरामध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. इचलकरंजीला लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण चांदोली धरणात करण्यात आले असून, ते पाणी वारणा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे दानोळी गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पाणीटंचाई भासणार नाही. तसेच सध्या कृष्णा नदीमध्ये जाणारे पाणीसुद्धा चांदोली धरणामध्ये सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीसाठी असलेली नळ योजना दानोळी गावासाठी विकासाची ठरणार आहे. म्हणून या योजनेला विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी सोडून द्यावी, असेही आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)


आमदारांच्या विरोधामुळे जादा भुर्दंड : बावचकर
वारणा नदीतून पाणी आणणारी मूळ योजना दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेतील कॉँग्रेसनेच तयार केली होती. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी केलेला विरोध आणि आता अमृत सिटी योजनेमध्ये या योजनेचा झालेला समावेश यामुळे नगरपालिकेला ही योजना महाग ठरत आहे, असा आरोप कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, त्यावेळी वारणा योजना ५४ कोटींची होती. युआयडीएसएसएमटी या योजनेच्या पॅटर्नमधून या योजनेला पाच कोटी रुपये नगरपालिकेचा हिस्सा होता. आता मात्र ७२ कोटी रुपयांची ही योजना झाली असून, अमृत सिटीच्या पॅटर्नप्रमाणे नगरपालिकेचा हिस्सा १८ कोटींचा झाला आहे, तर जीवन प्राधिकरणाला त्याचे शुल्क पावणे दोन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड नगरपालिकेवर बसला आहे.

Web Title: Final recognition of Ichalkaranji Varna plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.