डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची रविवारी अंतिम फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:39+5:302021-02-05T07:11:39+5:30
कोल्हापूर : कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा २०२१’ या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. ७ फेब्रुवारी ...
कोल्हापूर : कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा २०२१’ या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. ७ फेब्रुवारी येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असल्याची माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के व मानद सचिव डॉ. गीता पिल्लई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. राजेंद्र वायचळ म्हणाले, ‘राज्यात सहा विभागांमध्ये दर दोन वर्षांनी ही गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेची उपांत्य फेरी पूर्ण झाली असून, या उपांत्य फेरीमध्ये ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. आता या स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात घेण्याचा मान कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला मिळालेला आहे. कोल्हापूर झोनमध्ये सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी ३४ स्पर्धकांचा सहभाग असून, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे प्रायोजकत्व मिळाले आहे.
कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने पहिल्यांदा १९९८ ला ही स्पर्धा आयोजित केली. डॉक्टरांच्या या बहारदार सांगीतिक अंतिम सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे आर्ट सर्कलचे समन्वयक डॉ. पी. एम. चौगुले यांनी केले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्षा डॉ. आशा जाधव, डॉ. संजय घोटणे उपस्थित होते.