अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा २१ ऑक्टोबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:51 PM2020-10-16T13:51:49+5:302020-10-16T13:54:59+5:30
Shivaji University, kolhapurnews, educationsector, Student, exam चक्रीवादळाची शक्यता असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विद्यापीठाने शनिवार, सोमवार आणि मंगळवारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे या लेखी परीक्षांचा प्रारंभ आता दि. २१ ऑक्टोबरपासून होणार आहे.
कोल्हापूर : विविध विद्याशाखेच्या अंतिम सत्र, वर्षातील लेखी परीक्षा शनिवार (दि. १७) पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन शिवाजी विद्यापीठाने केले होते. मात्र, राज्यातील अतिवृष्टीमुळे चक्रीवादळाची शक्यता असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विद्यापीठाने शनिवार, सोमवार आणि मंगळवारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे या लेखी परीक्षांचा प्रारंभ आता दि. २१ ऑक्टोबरपासून होणार आहे.
विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा दि. १० ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात विविध मागण्यांसाठी विद्यापीठ सेवकांचे लेखणीबंद आंदोलन केल्याने या परीक्षेची तयारी ठप्प झाली. यासह ऑनलाईन परीक्षेसाठीची एजन्सी नियुक्त झाली नसल्याने विद्यापीठाने या परीक्षा दि. १७ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय घेऊन तयारी सुरू केली. त्यातच आता राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि चक्रीवादळाची शक्यता असल्याने ऑनलाईन परीक्षा घेण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या परीक्षा दि. २१ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, त्यांच्या सुधारित तारखा ऑनलाईन परीक्षा विभागाकडून जाहीर केल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू
ऑनलाईन परीक्षेचे विद्यार्थ्यांना स्वरूप माहीत व्हावे, यासाठी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) गुरुवारपासून सुरू झाली. या सराव परीक्षेच्या लिंकची माहिती देणारे एसएमएस आतापर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सायंकाळनंतर परीक्षेचा सराव केला. ऑनलाईन परीक्षेच्या प्रणालीची शिक्षकांना माहिती देण्यासाठीचे प्रात्यक्षिक आज, शुक्रवारी होणार आहे.