अखेर सिंधुदुर्गहून सीपीआरचे ३४ डॉक्टर्स परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 11:14 AM2022-01-04T11:14:34+5:302022-01-04T11:15:08+5:30
सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी म्हणून गेलेले सीपीआरचे ३४ डॉक्टर्स अखेर सोमवारी पुन्हा हजर झाले.
कोल्हापूर : सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी म्हणून गेलेले सीपीआरचे ३४ डॉक्टर्स अखेर सोमवारी पुन्हा हजर झाले. परंतु ज्याच्यासाठी हे सर्व जण कोकणात गेले होते ती राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची तपासणीही झाली नाही. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत केवळ या तपासणीसाठी कोल्हापूरच्याडॉक्टर्सना फेऱ्या माराव्या लागल्या आहेत. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठीच्या मूलभूत सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ पुरविलेले नाही. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने शिवसेनेचे नेते कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाचे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
याचाच एक भाग म्हणून कोरोनाची दुसरी लाट ऐन भरात असताना कोल्हापुरातून ३४ डॉक्टरांची बदली सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केली गेली. तेव्हापासून चार वेळा हे सर्व डॉक्टर्स राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या तपासणीवेळी हजर राहण्यासाठी सिंधुदुर्गला चार - पाच दिवसांसाठी गेले होते. परंतु आताही ही तपासणी झालेली नाही. यामुळे कोल्हापूरच्या सीपीआरमधील रुग्णांची मात्र मोठी गैरसाेय होत गेली आहे.
शिवसेना नेत्यांचा अट्टाहास
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने तुमच्याकडे मूलभूत सोयी-सुविधा नाहीत, वैद्यकीय अधिकारी नाहीत. तेव्हा तुम्ही पुढील वर्षी पुन्हा प्रस्ताव पाठवा, असे स्पष्टपणे या महाविद्यालयाला कळविले आहे. तरीही कोल्हापूरचे डॉक्टर्स तिकडे नेऊन तपासणी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु परिषदेने तपासणी न केल्याने अखेर डॉक्टर्स पुन्हा कोल्हापुरला परतले आहेत.