अखेर तब्बल बावीस दिवसानंतर पन्हाळगडाचा रस्ता तात्पुरता सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:54 PM2019-08-29T18:54:05+5:302019-08-29T19:01:12+5:30
अतिवृष्टीमुळे पन्हाळगडावर जाण्योयण्यासाठीचा रस्ता अखेर तब्बल बावीस दिवसानंतर गुरुवारी सायंकाळपासून सुरु करण्यात आला आहे. सध्या हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येत असून लवकरच अवजड वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे पन्हाळगडावर जाण्योयण्यासाठीचा रस्ता अखेर तब्बल बावीस दिवसानंतर गुरुवारी सायंकाळपासून सुरु करण्यात आला आहे. सध्या हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येत असून लवकरच अवजड वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा जसा तडाखा बसला तसाच तडाखा पन्हाळगडावर येण्याजाण्याचा एकमेव रस्ताही संपूर्णपणे खचला होता. वाघबीळपासून पन्हाळ्यापर्यंतच्या या रस्त्याचे या पावसात प्रचंड नुकसान झाले. ४ आॅगस्ट रोजी हा रस्ता खचल्यानंतर पन्हाळ्यावर येण्याजाण्याचा संपूर्ण मार्गच बंद झाल्याने पन्हाळ्यावरील नागरिकांचा संपर्क तुटला होता. या काळात पन्हाळ्यावर वीज, इंधन, जीवनावश्यक वस्तूंंचीही अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली होती.
तहसिलदार, प्रांत कार्यालयाने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात संपर्क साधला होता, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही यासंदर्भात तत्काळ कारवाई सुरु केली. राज्याचे बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनीही यासंदर्भात पन्हाळगडाची पाहणी केली आणि आपत्कालीन व्यवस्थापनातून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. आमदार सत्यजित पाटील आणि खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री विनय कोरे यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, उपअभियंता बी. एल. हजारे, अमोल कोळी, मुकादम आनंदा उधाळे, ठेकेदार पोपट पाटील, पन्हाळ्याचे नगराध्यक्षा रुपाली धडेल, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, रविंद्र धडेल यांच्या उपस्थितीत आज जनसुराज्यशक्तीचे संस्थापक आणि माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते पन्हाळगडावरील रस्ता आज वाहतूकीस खुला केला.
दरम्यान, आमदार सत्यजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे वाघबीळ-पन्हाळा या रस्त्यास पर्यायी मार्ग म्हणून बुधवार पेठ ते पन्हाळगड असा उड्डाणपूल मंजूर व्हावा, अशी मागणी केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.