अखेर ‘भागीरथी’ प्रकटली...
By admin | Published: August 12, 2016 12:21 AM2016-08-12T00:21:57+5:302016-08-12T00:22:53+5:30
रात्री ९.२९ मिनिटांनी दिव्य सोहळा : पंचगंगा मंदिर विद्युत रोषणाईने प्रकाशमय
महाबळेश्वर : क्षेत्र महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे होते. तब्बल बारा वर्षांनंतर गुरुवारी रात्री ९.२९ मिनीटांनी भागीरथी प्रकट झाली. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व दिव्यांनी सजवले आहे. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गंगापूजन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी दि. ११ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारा वर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करत होता. यावेळी भागीरथी नदी जलप्रवाह दृष्टिक्षेपास आला. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी क्षेत्र महाबळेश्वर येथे राज्यभरातील हजारो भाविक दाखल झाले
आहेत.
भागीरथी नदी बारा वर्षांनंतर प्रकट होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पंचगंगा देवस्थान व श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रात्रीच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते झेंडा पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून गंगापूजन झाले. (प्रतिनिधी)
क्षेत्र महाबळेश्वर
क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागीरथी आणि सरस्वती या नद्या उगम पावतात. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरू असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रूपाने वास करून असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही.