अखेर शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:02+5:302021-08-24T04:29:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा अखेर २३ ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत. कर्नाटक शासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी:
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा अखेर २३ ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत. कर्नाटक शासनाने कोरोनाचे नियम पाळून इयत्ता नववीपासून पुढील सर्व वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. यामुळे शाळांची घंटा वाजली आहे, पण कोरोनाचे सर्व नियम पाळणे हे सर्व शाळांना बंधनकारक आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळांना कुलूप लागले होते. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती पण ऑनलाइन शिक्षणामध्येही विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार येत होती.
यामुळे कर्नाटक शासनाने सोमवारपासून शाळांचे दरवाजे उघडण्यास परवानगी दिली आहे. नववीच्या पुढील इयत्ता सुरू झाले असून शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश करतानाच त्यांचे टेंपरेचर चेक करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझर व मास्क वापरण्यास सूचना देण्यात आल्या.
कर्नाटक शासनाने शाळा सुरू करताना प्रत्येक पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक केले आहे. ज्या पालकांची संमती आहे अशाच विद्यार्थ्यांनी शाळेत यावे. वर्गात सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. शाळा सुटल्यानंतर वर्गखोली सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. ज्या पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अनुमती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणही सुरूच राहणार आहे. दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजल्याने पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे येथे शाळा सुरू झाल्या आहेत.
फोटो श्रीपवाडी : संकपाळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात आला.