तीन वर्षापासून रखडलेल्या चित्रकर्मी पुरस्कारांना अखेर मुहूर्त
By admin | Published: April 29, 2017 06:19 PM2017-04-29T18:19:17+5:302017-04-29T18:19:17+5:30
जोशी, नरुले, गंगावणे, रकटे यांच्यासह १६ कलावंतांचा होणार सन्मान
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गीत लेखक श्रीकांत नरुले, पटकथा लेखक प्रताप गंगावणे अभिनेते विलास रकटे, यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील १६ कलावंत व तंत्रज्ञांना त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने दिले जाणारे चित्रकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहीती शनिवारी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा पुरस्कार यंदा ५ मे रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. २०१४ पासून काही तांत्रिक कारणामुळे हा पुरस्कार खंडीत झाला होता. तीन वर्षाचा कालावधी धरुन या पुरस्काराने चित्रकर्मींचा सन्मान करण्यात येणार आहे. मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार व शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुणे, मुंबई, उर्वरित महाराष्ट्रासाठी नाशिक किंवा सोलापूर येथेही या पुरस्काराचे वितरण स्वतंत्रपणे होणार आहे. या पुरस्कार समारंभात स्थानिक कलाकारांना मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानूसार कोल्हापूरातील कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक स्थानिक कलाकारांकडून तयारी करुन घेत आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गीत लेखक श्रीकांत नरुले, पटकथा लेखक प्रताप गंगावणे, ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक विलास रकटे,जगदीश पाटणकर, सांगली(निर्माता, दिग्दर्शक, लेखक), अभिनेत्री गीताबाई वंटमुरीकर,प्रकाश शिंदे (छायाचित्रण), अशोक पेंटर (कलादिग्दर्शक ),अशोक उर्फ प्रकाश निकम ( ध्वनीरेखक अभिनेत्री गीताबाई वंटमुरीकर, सिद्धू गावडे (निर्मिती व्यवस्थापक ), रंगभूषाकार शशी यादव, वेशभूषाकार कमल पाटील, किसन पोवार (लाईटमन-सहा.छायाचित्रण), कृष्णात चव्हाण (लाईटमन विभाग), विजय कल्याणकर(कामगार) यांचा,तर स्वर्गीय बजरंग रामचंद्र भोसले (वाईकर)यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे.
यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, शरद चव्हाण, सतीश बिडकर, संजय पिंपळे, व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर ,भरत दैनी, सागर बगाडे, संग्राम भालकर, अर्जुन नलवडे, अरुण चोपदार आदी उपस्थित होते.