...अखेर बेनिक्रेच्या कोरड्या तलावात अवतरली ‘वेदगंगा’
By admin | Published: January 21, 2016 11:22 PM2016-01-21T23:22:12+5:302016-01-22T00:53:13+5:30
चाचणी यशस्वी : २९ जानेवारीला पाणी पूजन, ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता; सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र येणार ओलिताखाली
दत्तात्रय पाटील -- म्हाकवे --शेतीसाठी लांबच; पिण्याच्या पाण्याचेही दुर्भीक्ष्य असणाऱ्या आणि धार्मिक पूजेसाठी उसाचे कांडेही वेदगंगा नदीकाठावरील गावांतून आणावे लागणाऱ्या बेनिक्रे (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी एकजुटीने सुरपली येथील वेदगंगा नदीतून पाणी योजनेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. यासाठी शेतकऱ्यांनीच कर्जाचा डोंगर पेलून येणऱ्या संकटांनाही खंबीरपणे सामोरे जात ही योजना यशस्वी केली.
या पाणी योजनेचे पाणी पूजन २९ जानेवारीला होणार असले तरी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाणी चाचणी घेण्यात आली. या चाचणीवेळी कोणतीही तक्रार उद्भवली नसून, सुमारे सव्वा तास पडणाऱ्या या योजनेच्या पाण्याकडे पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता झाली.
बेनिक्रेकरांची तहान भागविण्याच्या दृष्टीने १९८५ मध्ये ६४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा प्रकल्प झाला. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने डाव्या व उजव्या कालव्याची खुदाईही करण्यात आली. मात्र, या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतच नव्हता. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत होता. उभी पिके पाण्याअभावी वाळली तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.
त्यामुळे येथील ४५० शेतकऱ्यांनी बारमाही वाहणाऱ्या गावच्या उत्तरेकडील दिशेला डोंगरापलीकडून वाहणाऱ्या वेदगंगा नदीतून पाणी योजना करण्याचा मनोदय केला. या स्वप्नपूर्तीसाठी २०१३ मध्ये या शेतकऱ्यांनी आपले सातबारा गहाण देऊन बँक आॅफ इंडियाकडून सुमारे सव्वातीन कोटींचे कर्ज घेतले. यातून सुरुपलीजवळील नागरिकांपासून काम सुरू झाले.
मात्र, बेनिक्रेच्या हद्दीत असणाऱ्या केंद्रीय वनविभागाने खुदाईला परवानगी देण्यास वर्षभराचा विलंब लावला. तरीही या शेतकऱ्यांनी आस सोडली नाही. जोतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार गत महिन्यात वनविभागानेही खुदाईला परवानगी दिली आणि अखेर ही योजना पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना यश आले. यामध्ये अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करून व्यवस्थापनात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून पाच लाखांचे पारितोषिक पटकाविणाऱ्या जोतिर्लिंग संस्थेचेही मोठे योगदान आहे.
दरम्यान, या योजनेमुळे येथील सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २९) ग्रामस्थ विधिवतपणे या पाण्याचे पूजन करून ग्रामदैवतांना सवाद्य पाणी घालणार आहेत.
योजना अडीच वर्षे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत होता. चाचणी यशस्वी झाल्याने दडपण मुक्त झालो आहे.
-आण्णासाहेब वाडकर
अध्यक्ष, जोतिर्लिंग पाणी वापर संस्था
बेनिक्रेतील शेतीला आता यापुढे शाश्वत पाणी मिळणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह त्यांच्या पुढच्या पिढीला रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागणार नाही.
- बाळासो मगदूम, मारुती जाधव, शेतकरी, बेनिक्रे
ही पाणी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारी आहे. तसेच महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण ही आपोआप थांबणार आहे.
- सरिता चौगुले,
उपसरपंच, बेनिक्रे