...अखेर मतदार यादीचा घोळ संपला!
By admin | Published: October 14, 2015 12:40 AM2015-10-14T00:40:59+5:302015-10-14T01:07:35+5:30
४ लाख ५३ हजार २१० मतदारांचा समावेश
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या मतदार यादीचा घोळ अखेर मंगळवारी संपला. अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांत सुमारे ४४ हजार मतदारांच्या नोंदी दुरुस्त करताना महापालिका प्रशासनाच्या नाकी दम आला.
अंतिम मतदार यादीनुसार शहरातील ८१ प्रभागांत एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २ लाख २९ हजार ५१८ पुरुष मतदारांचा, तर २ लाख २३ हजार ६९२ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले की, चाळीस हजार मतदारांची नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली होती. निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमुळे ही चूक झाली होती; परंतु ती आमच्या यंत्रणेने शोधून काढली होती. ती दुरुस्त करून ज्या-त्या प्रभागात मतदारांची नावे नोंदविली; परंतु अंतिम मतदार यादीतही सुमारे ४२३९ मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली होती. त्यांची दुरुस्त करण्यात आली. एकूण मतदारांपैकी ४२४४ मतदारांची नावे विधानसभेच्या यादीत होती; परंतु महापालिका निवडणुकीच्या यादीत नावे नसल्याचे आढळून आले होते. त्याबाबत संबंधित मतदारांकडून पुरावे घेऊन नावांची नोंद करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ::दि. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिले प्रशिक्षण १८ आॅक्टोबरला, तर दुसरे २५ आॅक्टोबरला विवेकानंद महाविद्यालय आणि राजाराम महाविद्यालय येथे देण्यात येणार आहे. मतदानासाठी ४५० गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात पाचजणांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रत्येक क्षेत्रीय निवडणूक कार्यालयाकडे ७० गट मतदान प्रक्रिया राबविणार आहेत.
सहारिया सोमवारी कोल्हापुरात
राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया सोमवारी (दि. १९) कोल्हापुरात येणार असून, या दिवशी ते निवडणूक कामकाजाची पाहणी करणार आहेत.सर्व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.