राज्यातील ९ लाख बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:59+5:302021-04-30T04:28:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्यातील ९ लाख १७ हजार नोंदीत कामगारांच्या खात्यात अवघ्या चार दिवसांत १३७ कोटी ६१ लाखांचा निधी जमा केल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार राज्यातील नोंदीत १३ लाख कामगारांपैकी ९ लाख १७ हजार कामगारांना मदत दिलेली आहे. मागील वर्षी कोरोना काळात कामगारांना पाच हजार रुपये मदत दिली होती.
कडक निर्बंधांमुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन त्यांना मदतीचा निर्णय घेतला. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये असे आवाहनही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
२ लाख कामगारांची आरोग्य तपासणी
बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय बांधकाम मंडळाकडून घेण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत २ लाख ३ हजार जणांची आरोप तपासणी केली आहे. इतर नोंदीत कामगारांची तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.