Kolhapur Crime: ए.एस.मधील गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी, कर्ज काढून केली होती गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:26 PM2023-03-02T13:26:53+5:302023-03-02T13:27:20+5:30

तक्रारी वाढल्यानंतर कंपनीने दोन महिन्यांपूर्वी काही गुंतवणूकदारांना परतावे जमा केल्याचे मेसेज पाठवले. प्रत्यक्षात मात्र पैसे खात्यावर जमा झालेच नाहीत.

Financial crisis of investors in A.S traders Kolhapur, loan was written off investment | Kolhapur Crime: ए.एस.मधील गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी, कर्ज काढून केली होती गुंतवणूक

संग्रहीत छाया

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून ए. एस. ट्रेडर्स कंपनीकडून परतावे बंद असल्यामुळे गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. जादा परताव्याच्या हव्यासामुळे अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ए. एस. मध्ये गुंतवणूक केली. आता वसुलीसाठी बँकांचा तगादा वाढल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल आहेत. परतावा बंद आणि मूळ रक्कमही अडकल्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे.

ए.एस. ट्रेडर्स कंपनीकडून कमी कालावधीत जादा परतावा मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांत हजारो लोकांनी कंपनीत पैसे गुंतवले. अनेकांनी बँकांकडून घर, प्लॉट, वाहने, दागिन्यांवर कर्ज काढून ए.एस.मध्ये पैसे गुंतवले. सुरुवातीचे काही महिने चांगला परतावा मिळाल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी पुन्हा मोठ्या रकमा गुंतवल्या. सप्टेंबर २०२२ पासून ए.एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीचे परतावे बंद झाले आहेत. कर्ज काढून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे बँकांचे हप्ते सुरूच आहेत. अनेकांचे हप्ते थकले आहेत. मार्च एंडिंगमुळे बँकांनी वसुलीचा तगादा लावल्यामुळे गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

पुण्यातील दाम्पत्याचा आत्महत्येचा इशारा

पुणे जिल्ह्यातील एका गुंतवणूकदाराने पत्नीच्या नावे कंपनीत ५१ लाखांची गुंतवणूक केली. त्यासाठी त्याने सात खासगी बँकांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना दरमहा एक लाख ३० हजार रुपयांचा हप्ता भरावा लागतो. गेली पाच महिने त्यांनी घरातील दागिने गहाणवट ठेवून बँकांचे हप्ते भागवले. आता त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. गुंतवलेली रक्कम ए.एस. कडून परत मिळत नाही आणि बँकांचा तगादा सुरू असल्यामुळे त्यांनी ए.एस. ट्रेडर्सच्या संचालकांना मेल पाठवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात असे संकट अनेक गुंतवणूकदारांसमोर आहे.

गोव्यातही झाली फसवणूक

ए. एस. ट्रेडर्सने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढत असून, गोव्यातील एका गुंतवणूकदाराने गेल्या आठवड्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यात कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. त्याशिवाय जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.

केवळ मेसेज, पैसे नाहीतच

परतावे बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कंपनीने दोन महिन्यांपूर्वी काही गुंतवणूकदारांना परतावे जमा केल्याचे मेसेज पाठवले. प्रत्यक्षात मात्र पैसे खात्यावर जमा झालेच नाहीत. कंपनीतील खात्यावर रक्कम दिसते, पण काढता येत नाही, अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे.

Web Title: Financial crisis of investors in A.S traders Kolhapur, loan was written off investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.