शिवाजी विद्यापीठाकडून कमकुवत महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ
By admin | Published: February 12, 2016 12:57 AM2016-02-12T00:57:01+5:302016-02-12T00:59:08+5:30
५२ व्या दीक्षांत समारंभात पदवी, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस मान्य
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील शिवाजी विद्यापीठ संलग्नित कमकुवत महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ देण्यास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी मान्यता दिली.विद्यापीठाच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन आणि विद्या परिषदेची बैठक झाली. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सन २०१५-१६ मध्ये विद्यापीठ संलग्नित कमकुवत महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यासाठी छाननी समितीने केलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या. ५२ व्या दीक्षांत समारंभात पदवी, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस मान्य करण्यात आली.
विद्यापीठाचा सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील मराठी आवृत्तीतील ५२ वा वार्षिक अहवाल, तसेच विद्यापीठाचे सन २०१५-१६चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे वार्षिक अंदाजपत्रक व मूल्यमापन अहवाल दुरुस्तीसह मान्य करण्याबाबत अधिसभेस शिफारस करण्यात आली. त्यासह विद्यापीठातील संगणकशास्त्र विभाग व पुण्यातील सी-डॅक, विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि शासकीय तंत्रनिकेतनची धातुतंत्र प्रबोधिनी, तसेच नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच विद्यापीठ आणि येउंगनाम युनिव्हर्सिटी (रिपब्लिक आॅफ कोरिया) यांच्यात करार करण्यास मान्यता दिली. (प्रतिनिधी)
‘बहाई अकॅडमी’ मान्यताप्राप्त परिसंस्था
विद्या परिषदेच्या बैठकीत पाचगणीमधील ‘बहाई अकॅडमी’ या संस्थेला मान्यताप्राप्त परिसंस्था म्हणून मान्यता देण्यात आली. विद्यापीठाला विविध महाविद्यालयांकडून त्यांच्या महाविद्यालयात अभ्यासक्रम बंद करण्याबाबत अथवा प्रवेश क्षमता घट करण्याबाबत आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाची व्यवस्थापन परिषदेला शिफारस करण्यात आली.