गद्दारांचा शोध घेऊन शिक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:56+5:302020-12-29T04:22:56+5:30

कोल्हापूर : पक्षाशी गद्दारी केलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ ...

Find and punish traitors | गद्दारांचा शोध घेऊन शिक्षा करा

गद्दारांचा शोध घेऊन शिक्षा करा

Next

कोल्हापूर : पक्षाशी गद्दारी केलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर शहर शिवसेनेमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक घेतली. या बैठकीतही त्यांच्या वादाचे पडसाद दिसून आले. यावेळी गट-तट बाजूला ठेवून लढल्यास शिवसेनेच्या २५ पेक्षा जास्त जागा निश्चित येतील, असा दावाही केला. संपर्कमंत्री सामंत यांनी एकदिलाने काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन केले. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती.

चौकट

बैठकीनंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पोषक वातावरण असून भाजपला निवडणुकीत दूर ठेवण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतील. शिवसेनेतील गटबाजीमुळे आतापर्यंत पक्षाला तोटाच झाला आहे. आता मात्र महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शहरातील गटबाजी संपवा, अशा सूचना शिवसेनेतील नेत्यांना केल्या. तसेच ८१ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करण्याचे सांगितले आहे.

मतभेद, मनभेद नाहीत

शहर शिवसेनेत अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसत असल्याबाबत विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, शहर शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. ही पक्ष जिवंत असण्याची लक्षणे आहेत. संपर्कप्रमुख दुधवडकर आणि शिवसेनेचे दोन्ही खासदार हा वाद मिटवतील आणि आम्ही महापालिकेची निवडणूक एकसंध राहून लढू.

Web Title: Find and punish traitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.