कल्पक प्रयोगातून शेती केली फायद्याची

By admin | Published: December 29, 2014 11:32 PM2014-12-29T23:32:00+5:302014-12-29T23:44:33+5:30

आंतरपिकातून ७५ ते ८० हजारांचे उत्पन्न : शिवाजी पाटील (माजगावकर) यांनी मिळविले भरघोस उत्पन्न

Fine farming is beneficial for you | कल्पक प्रयोगातून शेती केली फायद्याची

कल्पक प्रयोगातून शेती केली फायद्याची

Next

उसाची सात एकर शेती असूनही कर्जाचा ताळेबंद घालता येत नव्हता. उसाच्या पिकाखाली शेत अनेक महिने अडकून पडायचे. ऊसदराबाबतची अनिश्चितता याला कंटाळून कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील शेतकरी शिवाजी पाटील (माजगावकर) यांनी आपल्या सात एकर ऊसशेतीतील एक एकर क्षेत्रात कल्पक प्रयोग म्हणून झेंडू फुलाची लागवड केली. तसेच झेंडू काढणीच्या काळात केळी पिकाच्या लावणीचे नियोजन केले. केळी लागवडीतून फक्त अकरा महिन्यांत केळी काढणीला आल्यानंतर अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले.
पाटील यांनी केळीच्या दृष्टीने नियोजन केले. त्यांनी एक एकर शेतीमध्ये आडवी-उभी अशी खोल नांगरट केली. यात चार फुटांची सरी काढून नोव्हेंबर महिन्यात झेंडू फुलांची लागवड केली. तीन महिन्यांनंतर काढणीच्या अवस्थेत नियोजनाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात ‘वारणे’तून जी-९ जातीची एक फूट उंचीची लावण योग्य केळीची १००० रोपे आणून ६ बाय ५ या अंतराने लावली. लावण झाल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत डी. ए. पी. ५० किलो, पोटॅश व लिबोली ५० किलो असा खतांचा पहिला डोस दिला. केळीचे रोपे तीन महिन्यांची असेपर्यंत रोगाला बळी पडतात म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे कीटकनाशके, बुरशीनाशके व मुळांची वाढ होण्यासाठी ह्युमी-४ औषधे फवारणी व आळवणीच्या पद्धतीने वापरली.
अडीच ते तीन महिन्यांनी केळीची
रोपे भरणीच्या अवस्थेत आली. पॉवर ट्रेलरने भरणी करताना डीएपी, पोटॅश व निंबोळी अशी तीन प्रकारची खते पहिल्या डोसच्या दुप्पट म्हणजे १०० किलोप्रमाणे वापरली. रोपांच्या बुंध्यात चांगली भर घातली. खतांच्या दुसऱ्या डोसनंतर, पानांच्या सावलीमुळे तणांची वाढ होणे बंद झाले. खतांचा तिसरा डोस दिल्यानंतर अवघ्या सातव्या महिन्यापासून केळीला घडाची फुले धरली. घड अकराव्या महिन्यापर्यंत पूर्ण होण्याअगोदर नवव्या महिन्यात खताचा पुन्हा चौथा डोस दिला. यामुळे घडाची व केळीची लांबी व जाडी वाढण्यास मदत झाली. केळावर डाग दिसू नये, केळी स्वच्छ व फण्यांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून ०५२३४ आणि फोर्स ही कीटकनाशके काढणी आधी एक महिन्यात तीनवेळा फवारली. सध्या केळी काढणीच्या अवस्थेत असून एका घडाचे वजन किमान ३५ ते ४० किलो, तर घडात प्रत्येकी १८ ते २० केळांच्या ११ ते १२ फण्या आहेत. सध्या याच केळांना १० हजार ते ११ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून, एक एकरातून किमान २५ टन केळी मिळणार आहेत. जरी सरासरी १० हजार प्रतिटन दर मिळत गेला, तरी दोन लाख ५० हजारपर्यंत एकूण उत्पन्न आहे. हे पीक केवळ ११ महिन्यात काढणीला आले असून, खोडवा ठेवून चांगले उत्पन्न मिळविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी याच क्षेत्रातील झेंडूच्या फुलांच्या आंतरपिकातून ७५ ते ८० हजार उत्पन्न केवळ तीन महिन्यांत मिळाले. १२ महिन्यांत सर्व खर्च वजा जाता अडीच ते पावणेतीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाल्याचेही पाटील यांनी सांगितले.
- प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे


केळी बारमाही पीक
केळीची लागवड कोणत्याही महिन्यात करता येते. मे-जून मध्ये वादळी पाऊस असल्याने जानेवारी-फेब्रुवारीत लागवड केल्यास डिसेंबर, जानेवारी या सुरक्षित काळात केळी काढण्यास येतात. यामुळे घड कितीही वजनाचा असला तर केळीची मोडतोड न झाल्याने आर्थिक नुकसान टळते. उन्हाळा असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागते, पण उसापेक्षाही केळीला पाट पद्धतीने पाणी दिले तरी कमी पाणी लागत असल्याचे निरीक्षणाअंती सिद्ध झाले आहे.


काटापेमेंटने फायदा
सध्या केळी खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी काट्यावरच पेमेंट देत असल्याने उसाप्रमाणे पैशाला वाट पाहावी लागत नाही. ऊस पीक १५ ते १६ महिन्यांनी तोडले जाते, तर पैशासाठी एक ते दोन महिने वाट पाहावी लागते. म्हणून ज्याच्याजवळ नियोजन आहे, त्यांना केळी पीक फायद्याचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Fine farming is beneficial for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.