नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सव्वा आठ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:52+5:302021-07-03T04:16:52+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शुक्रवारी दिवसभर नाकाबंदी केली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ८ लाख ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शुक्रवारी दिवसभर नाकाबंदी केली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ८ लाख ३२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर नाकाबंदी केली होती. त्याअंतर्गत विनामास्क फिरणारे, वाहन नियमांचे उल्लंघन करणारे आणि निर्धारित वेळेचा भंग करून आस्थापना सुरू ठेवणारे अशा सर्वांवर कारवाई करण्यात आली. त्यात ८ लाख ३२ हजार ६०० रुपयांचा पोलिसांनी दंड वसूल केला. यात १९१८ वाहन केसद्वारे ३ लाख ८२ हजार ६०० रुपये, तर विनामास्क फिरणाऱ्या १७२४ जणांकडून २ लाख ९१ हजार ३०० असा दंड वसूल केला. याशिवाय ७६ आस्थापनांवरही कारवाई करीत ५८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनांचे विमा, पीयूसी, वाहन चालविण्याचा परवाना आदीची मुदत संपली असतानाही वाहन रस्त्यावर फिरवून मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ४०४ वाहने जप्त केली.