फिरंगोजी शिंदे यांच्या स्मृतिदिनी मशाल दौड
By Admin | Published: December 6, 2015 01:03 AM2015-12-06T01:03:34+5:302015-12-06T01:35:01+5:30
भवानी मंडप येथून सुरुवात : संभाजी ब्रिगेड, गिरगाव ग्रामस्थ व इतिहासप्रेमी यांच्यावतीने आयोजन
कोल्हापूर : ‘क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे अमर रहे, अमर रहे,’अशा घोषणा देत येथील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिज्योत मशाल दौड येथील भवानी मंडप येथून शनिवारी काढण्यात आली. सकाळी आनंदसिंह शितोळे -देशमुख यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या क्रांतिज्योत मशालीचे उदघाटन झाले. त्यानंतर ही क्रांतिज्योत मशाल दौड शहरातील विविध भागांत फिरून शिंदे यांच्या गिरगाव (ता. करवीर) या मूळ गावाकडे रवाना झाली.
पाच डिसेंबर १८५७ ला भवानी मंडप येथे झालेल्या लढ्यातील शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी या क्रांतिज्योत मशाल दौडीचे आयोजन संभाजी ब्रिगेड, गिरगाव ग्रामस्थ व इतिहासप्रेमी यांच्यावतीने करण्यात आले होते. भवानीमंडप येथून क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या क्रांतिज्योत मशाल दौडला सुरुवात झाल्यानंतर ही दौड शिवाजी चौकात आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बिंदू चौक, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, पाचगाव मार्गे गिरगावकडेरवाना झाली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रूपेश पाटील म्हणाले, गिरगाव येथे शनिवारी रात्री फिरंगोजी शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी ५०० दिवे लावून दीपोत्सव साजरा करणार आहे.
या दौडमध्ये शिवाजी गुरव, संभाजी पाटील, सर्जेराव कोंडेकर, ओंकार पाटील, ऋषिकेश पाटील, उमेश पोवार, संकेत साळोखे, बंडू कुरणे, संभाजी साळोखे, प्रवीण पाटील, संदीप मेढे यांच्यासह गिरगावचे ग्रामस्थ, इतिहासप्रेमींचा सहभाग होता.
फिरंगोजी शिंदे यांचा हौतात्म्य दिन...
गिरगाव (ता. करवीर) येथे क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्या गावी शनिवारी इतिहास प्रेमींच्यावतीने हौतात्म्य दिन साजरा केला. शिंदे यांच्या स्मारकाजवळ मशाली व पणतीच्या उजेडात पुष्पचक्र वाहून हौतात्म्य दिन साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, हिल रायडर्स अॅण्ड हायकर्स गु्रपचे प्रमोद पाटील, मैत्रेय प्रतिष्ठानचे डॉ. अमर आडके, समीर अॅडव्हेंचरचे विनोद कांबोज, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, विराज पाटील, प्रसाद आडनाईक, सरपंच संध्या पाटील, उपसरपंच यांच्यासह चंदन मिरजकर, सूरज ढोली, स्नेहल रेळेकर, पी. जी. जाधव, राणोजी पाटील, महेश नलवडे, आदी उपस्थित होते.