Kolhapur: टाकवडेत कारखान्याला आग, आगीमुळे सिलेंडरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:31 IST2025-01-27T12:30:58+5:302025-01-27T12:31:48+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे स्वीट आणि नमकीन कारखान्याला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक ...

Kolhapur: टाकवडेत कारखान्याला आग, आगीमुळे सिलेंडरचा स्फोट
गणपती कोळी
कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे स्वीट आणि नमकीन कारखान्याला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. मशिनरी, कच्चा माल, तयात माल असे सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. आज, सोमवार (दि.२७) पहाटे पाचच्या सुमारास ही आगीची घटना घडली.
आगीमुळे सिलेंडर पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत गेला. या स्फोटामुळे कामगार व ग्रामस्थांना आगीची घटना समजली. इंचलकरंजी, कुरुंदवाड, दत्त साखर कारखान्याच्या पाच अग्निशमन बंबानी सुमारे दोन तासांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रविंद्र विनायक पोळ यांची जांभळी टाकवडे रस्त्यावर आनंदी स्वीट आणि नमकीन कारखाना आहे. रविवारी रात्री कारखाना बंद करुन गेले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आगीमुळे सिलेंडर पेट घेवून त्याचा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की लगतच्या घरातील भांडी खाली पडले. आवाजाचा कानठळ्या पडल्याने कामगारासह नागरीकांना जाग आली. यामध्ये राजगिरा लाडू, बटाटू वेपर्स, तेलाचे डबे, गुळ, कच्चा माल जळून खाक झाले. शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.