Kolhapur News: ट्रान्सफार्मर फुटून आगीचा भडका, विद्युत वाहिन्या जळून खाक; निम्म्या इचलकरंजीत वीज खंडित 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:37 PM2023-02-24T13:37:47+5:302023-02-24T13:38:13+5:30

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा व अग्निरोधकच्या साहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणली.

Fire breaks out due to transformer burst, power cut in half of Ichalkaranji | Kolhapur News: ट्रान्सफार्मर फुटून आगीचा भडका, विद्युत वाहिन्या जळून खाक; निम्म्या इचलकरंजीत वीज खंडित 

संग्रहीत छाया

googlenewsNext

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयालगतच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर फुटून आगीचा मोठा भडका उडाला. त्यामध्ये बी झोनच्या मोठ्या विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे १० एम. ए. पॉवरचे तीनही ट्रान्सफार्मर बंद पडून निम्म्या इचलकरंजी शहराचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा व अग्निरोधकच्या साहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणली.

त्यानंतर पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
शहरातील सर्वाधिक वीजपुरवठा करणारे बी झोन कार्यक्षेत्रातील सबस्टेशन स्टेशन रोडवर आहे. तेथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे शहरातील निम्म्या भागात विद्युतपुरवठा खंडित झाला. आसपासचे महावितरण कर्मचारी आग विझवण्यासाठी धावले. अग्निरोधकाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निरोधक व पाण्याचा मारा करून तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी सबस्टेशनमधील मोठ्या विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्या. 

यावेळी करंट प्रोटेक्शन पॉवर ट्रान्सफार्मरमधील बुशिंग फुटून ऑईलमुळे आग लागल्याचे महावितरणच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. सबस्टेशनमधून होणारा खंजिरी इंडस्ट्रीज भाग, तीन बत्ती चौक परिसर, जवाहरनगरचा काही भाग, भोने मळा, एएससी कॉलेज, शाहू पुतळा, आयजीएम परिसर आदी भागांतील विद्युत पुरवठा बंद झाला. त्वरित महावितरणने भागात पर्यायी मार्गाने विद्युतपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. 

कार्यालयातील जीआय सबस्टेशन, इचलकरंजी वन टेन, आवाडे सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे काम सुरू होते. कोल्हापूर महावीर महावितरणचे विशेष पथक येथील महावितरण कार्यालयात दाखल झाले आहे. तपासणी व दुरुस्ती करून शुक्रवारी (दि.२४) सकाळपर्यंत बंद पडलेल्या सबस्टेशनमधील वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Fire breaks out due to transformer burst, power cut in half of Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.