हाळोलीतील २५ एकरांतील काजू बागेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:08+5:302021-03-16T04:24:08+5:30
आजरा : हाळोली व वेळवट्टी (ता. आजरा) दरम्यान असलेल्या २५ एकर क्षेत्रातील काजू बागेला लागलेल्या आगीत अंदाजे १२०० ते ...
आजरा : हाळोली व वेळवट्टी (ता. आजरा) दरम्यान असलेल्या २५ एकर क्षेत्रातील काजू बागेला लागलेल्या आगीत अंदाजे १२०० ते १५०० झाडे जळाली. सातवानचा माळ व हुंबराचे पाणी नावाच्या शेतात दुपारी १ वाजता आग लागली. आगीत शेतकऱ्यांचे काजू बाग, मेसकाठीचे अंदाजे १० लाखांवर नुकसान झाले.
आजरा-आंबोली रस्त्याशेजारील राणे यांच्या पोल्ट्री फार्मपासून आगीला सुरुवात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दुपारच्या वेळेत लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा १५ ते २० फूट उंचीपर्यंत होत्या. त्यातच वारा असल्याने आग सर्वत्र पसरली. परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आग सुरूच होती. आग सायंकाळी चाळोबाच्या जंगलात घुसली होती. वनविभागाचे कर्मचारी ब्लोअरिंग मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणत होते.
..........
गवतामुळे आग वाढली
जंगलाशेजारील या खासगी मालकीच्या जमिनीत वारंवार हत्ती व गव्यांचा वावर असतो. त्यांच्या भीतीने चालू वर्षी शेतकऱ्यांनी गवत कापलेले नाही. या आगीत वाढलेले गवत जळाले. त्याच्या ज्वाळा १५ ते २० फूट उंचीच्या होत्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या.
हत्ती गेला, आग घुसली..
गेल्या आठ वर्षांपासून टस्कर हत्तींचा कळप या परिसरात तळ ठोकून आहे. गेले आठ ते दहा दिवसांपासून टस्कर हत्ती घाटकरवाडी परिसरात गेले आहेत. पण, हत्ती पिके खाण्याबरोबर तुडवण करीत होता. आज आगीने सगळेच भुईसपाट केले आहे.
---------------------------
* फोटो ओळी : हाळोली (ता. आजरा) येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली काजू बाग.
क्रमांक : १५०३२०२१-गड-१४