जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच पेटवली चूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:41 AM2019-12-04T11:41:56+5:302019-12-04T11:43:58+5:30
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पर्यायी जागा दिल्याशिवाय हलणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली.
कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पर्यायी जागा दिल्याशिवाय हलणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली.
टेंबलाईवाडी येथील गट नंबर ५ अ-१-अ पैकी महापालिकेच्या हद्दीमधील रिकाम्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून ९० बेघरांनी झोपड्या मारल्या होत्या. प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी पोलीस बळाच्या साहाय्याने झोपडपट्ट्या हटविल्या. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. येथील रहिवासी बाळाबाई बागडे या महिलने चक्क प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत प्रशासनाचा निषेध केला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने पोलीस बळाचा गैरवापर करीत झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी महिलांना मारहाण करण्यात आली. यामध्ये धर्मा सावंत ही महिला जखमी झाली असून, त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. ही शासकीय जागा आहे; परंतु झोपडपट्टीधारकांशी चर्चा न करताच दडपशाहीचा वापर करून झोपड्या उद्ध्वस्त केल्या. सर्वजण बेघर झाले असून प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे.
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यावर निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांनी ‘या प्रकरणी चौकशी करू,’ अशी ग्वाही दिली. यावेळी धनाजी सकटे, दीपक सावंत, रामचरण रवी, अजित लोखंडे, सर्जेराव कांबळे, संजय चौगले, अनिल माने, भीमराव कांबळे, सुरेश बागडे, प्रफुल्ल कांबळे, अजित कोराणे, किशोर गारवे, आदी उपस्थित होते.