अग्निशमनच्या गाडीला रस्ता दिसेना! कुरुंदवाडमध्ये वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:39 PM2018-06-27T23:39:24+5:302018-06-27T23:39:56+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत
गणपती कोळी ।
कुरुंदवाड : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत आहे. येथील दौलतशहावली मार्केटमध्ये असणाऱ्या अग्निशमन कार्यालयासमोर दररोज दोन चाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने लावून वाहतुकीची कोंडी केली जाते. याचे गांभीर्य कोणालाच राहिले नाही. यामुळे अग्निशमन विभागाची तरी वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
येथील दौलतशहावली मार्केटमध्ये अग्निशमन कार्यालय आहे. एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्वरित पोहोचता यावे, यासाठी अग्निशमन गाडी पाणी भरून सज्ज असते. शिवाय या कार्यालयाकडे चोवीस तास सेवा देणारे फायरमन व ड्रायव्हर असा सात कर्मचाºयांचा जागता पहारा आहे.
या मार्केटमध्ये दररोज भाजीपाला, फळभरणी सौदा होतो. त्यासाठी सांगली, कोल्हापूरहून कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी शेतीमाल विक्रीसाठी व खरेदीसाठी येत असतात. दुपारपर्यंत सौदा सुरू असल्याने या परिसरात दोनचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी असते.
अग्निशमन कार्यालय ते मुख्य रस्ता या मार्गात वाहनांसाठी नो पार्किंग आहे. मात्र, व्यापारी, व्यावसायिक, वाहनचालक नो पार्किंग नियमांचे पालनच करीत नाहीत. शिवाय या गंभीर समस्येकडे ना पालिकेचे, ना पोलीस ठाण्याचे लक्ष आहे. निर्ढावलेले वाहनचालक अग्निशमन कर्मचाºयांच्या विरोधाला दादच देत नाहीत. त्यामुळे ही अत्यावश्यक सेवाही वाहतुकीच्या कोंडीत अडकली आहे.
कृत्रिम समस्यांची दृष्ट
अग्निशमन विभागाच्या उत्कृष्ट व तत्पर सेवेमुळे पालिकेचा हा अग्निशमन विभाग जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या अव्वलस्थानी आहे. मात्र, त्यांच्या या कर्तृत्वाला कृत्रिम समस्यांची दृष्ट लागत आहे.अडचणीची जागा : पालिकेने अग्निशमन विभागाच्या माळभागातील औद्योगिक वसाहतीत अग्निशमन गाडी थांबण्याची इमारतही बांधली आहे. मात्र, कर्मचाºयांचे निवासस्थान नसल्याने कार्यालय दौलतशहावली मार्केटमधून हलविले नाही. या मार्केटमधील अडचणीच्या जागेमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणारच आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कार्यालय औद्योगिक वसाहतीत हलविणे सोयीचे ठरणार आहे.