गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:02 PM2022-01-13T12:02:53+5:302022-01-13T12:31:37+5:30
काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी सहकारी औद्योगिक वसाहतीमधील काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आज, गुरुवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, मूळचे जयसिंगपूर येथील उद्योजक सुशील नथुराम गुप्ता यांनी चार वर्षांपूर्वी हसूरचंपू येथील औद्योगिक वसाहतीत काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्याच्या सुमारे ५ हजार चौरस फूटाच्या शेडमधील गोदामात काजूची टरफले मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, गुरूवारी (१३) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने कारखान्यात आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण गोदामाला घेरले. त्यामुळे आग विझवण्यासाठी गडहिंग्लज व कागल येथून अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या मागविण्यात आल्या. दोन जेसीबीच्या सहाय्याने काजुची टरफलाची पोती बाजूला काढून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
आगीत कारखान्याचे शेड, मशिनरी व काजु टरफलाचा कच्चा माल मिळून सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रमुख महादेव बारामती, हसूरचंपूचे उपसरपंच सचिन शेंडगे, जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफिक नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
म्हणूनच अनर्थ टळला..!
जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफिक नाईकवाडे यांनी आगीची तमा न बाळगता जेसीबी मशीन थेट आगीत घुसवुन टरफलाच्या पेटलेल्या पोती कारखान्याच्या बाहेर मोकळ्या जागेत काढून टाकत होते. त्यावर पाणी मारून आग विझवण्यात येत होती. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. अन्यथा शेजारी आणखी एक काजू कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.