कोल्हापूरमधील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपट्टीत आग, चार ते पाच घरे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 01:31 PM2022-11-29T13:31:23+5:302022-11-29T13:32:10+5:30
झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
उद्धव गोडसे
कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरातील सनराईज हॉस्पिटल समोरील झोपडपट्टीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीत चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत, तर आसपासच्या घरांनाही आगीची झळ बसली. अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.
झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. एका घरात आगलेली आग आसपासच्या घरांमध्ये पसरली. कमी जागेत दाटीवादीच्या घरांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. एका घरातील दोन गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आगीचा भडका उडाला.
आग लागताच परिसरातील नागरिकांनी घरातील साहित्य बाहेर काढले अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत घरांचे आणि झोपड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमध्ये घरे जळून खाक झाल्याने अनेकांच्या संसाराची राख झाली, त्यामुळे महिलांनी टाहो फोडला.