आजऱ्यात गोठ्याला आग; सात लाखांचे नुकसान

By admin | Published: January 14, 2016 01:01 AM2016-01-14T01:01:06+5:302016-01-14T01:01:06+5:30

नऊ म्हशी होरपळल्या : एकीचा मृत्यू, पाच गंभीर

A fire in a jungle; Loss of seven lakh | आजऱ्यात गोठ्याला आग; सात लाखांचे नुकसान

आजऱ्यात गोठ्याला आग; सात लाखांचे नुकसान

Next

आजरा : आजरा येथील तळ्याचा माळ या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळच असणाऱ्या परिसरातील गट नं. ७३ मधील सिलेमान इब्राहिम सोनेखान यांच्या गोठ्यास दीडच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत नऊ म्हशी होरपळल्या. यामध्ये एक म्हैस जागीच जळून खाक झाली. दोन अंध झाल्या, तर पाच गंभीर अवस्थेत आहेत. संसारोपयोगी साहित्य, मोटारसायकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.
सिलेमान सोनेखान यांनी शेतामध्ये उभारलेल्या सातशे चौरस फुटाच्या गोठ्यामध्ये नऊ म्हशींसह, मोटारसायकल, पाण्याच्या टाक्या, पाणी भरण्याचे गाडे, असे बरेच साहित्य होते. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागली. निर्जनस्थळी गोठा असल्याने व सोनेखान कुटुंबीय जिजामाता कॉलनी येथील घरी गेल्याने आगीची कल्पना आली नाही.
आगीमुळे गोठ्याचे छप्पर अंगावर कोसळून एक म्हैस जागीच ठार झाली. बांधलेल्या असल्याने इतर म्हशींना पळता आले नाही. गंभीर भाजल्याने दोन म्हैशींना अंधत्व आले, तर तीन म्हशी अत्यवस्थ आहेत. अर्ध्या तासानंतर धुराचे लोट उठल्याने या परिसरात असणारे शेतकरी घटनास्थळी गेले. त्यांनी काठ्यांच्या सहायाने आठ जनावरे बाहेर काढली, परंतु, त्यांची कातडी सोलून गेली आहे. विलास भुर्इंबर, समीर सोनेखान, रिझवान सोनेखान, बाळू डोंगरे, हेमंत डोंगरे, आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. डी. पडिले यांच्यासह महसूल व पशुधन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन माहिती घेतली. पशुधन विकास अधिकारी पी. डी. ढेकळे, ‘गोकुळ’चे डॉ. एल. बी. तांबे, डी. ए. मुल्लाणी, सुभाष पारपोलकर, सदाशिव मांगले यांचे पथक जखमी जनावरांवर उपचार करीत आहेत.
अपघात की घातपात?
ही आगीची घटना अपघात की घातपात, असा प्रश्न आहे. आठवडाभरापूर्वी येथे राखणीसाठी असणाऱ्या दोन कुत्र्यांचा विष प्रयोगाने मृत्यू झाला, तर गोठ्याच्या परिसरातील गवत सोनेखान कुटुंबीयांनी पूर्वीच स्वच्छ केले होते.
लाखाची म्हैस खाक
‘गोकुळ’च्या वासरू संगोपन योजनेअंतर्गत तयार झालेल्या गाभण म्हैशीसाठी चारच दिवसांपूर्वी एक लाख रुपयांना मागणी झाली होती. ती म्हैस जळाली. या प्रकाराने सोनेखान कुटुंबीय हादरून गेले आहे.

Web Title: A fire in a jungle; Loss of seven lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.