सोनगेतील युवकांच्या प्रसंगावधानतेने डोंगराला लागलेली आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:48 PM2021-04-08T17:48:12+5:302021-04-08T17:57:20+5:30
fire Forestdepartment Kolhapur-पंखा आणि कुलरजवळ बसूनही अंगाची लाहीलाही होत असताना ऐन दुपारच्या उन्हात डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी सोनगे(ता.कागल) येथील युवकांनी साखळी तयार करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे हजारो झाडे,पशुपक्षी,सरपटणाऱ्या प्राण्याचे जीव वाचले आहेत.त्यांच्या कार्याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.
दत्ता पाटील
म्हाकवेः पंखा आणि कुलरजवळ बसूनही अंगाची लाहीलाही होत असताना ऐन दुपारच्या उन्हात डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी सोनगे(ता.कागल) येथील युवकांनी साखळी तयार करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे हजारो झाडे,पशुपक्षी,सरपटणाऱ्या प्राण्याचे जीव वाचले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.
सोनगे गावच्या दक्षिणेला सोनगेसह बेनिक्रे, हमिदवाडा व कुरुकली या चार गावांच्या सीमा जुळलेल्या आहेत. दीडशे एकराहून अधिक क्षेत्रात विस्तारलेल्या या डोंगरात गर्द झाडी आहे. गतवर्षी येथील युवकांनीही हजारो झाडे लावली आहेत.दाट झाडीमुळे येथे विविध जातीचे पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वनरक्षक शामराव शिंत्रे यांनी युवकांना माहिती देताच अमर पाटील सुचित शिंत्रे, सुयोग शिंत्रे सचिन शिंत्रे,सुरज शिंत्रे, नितीन शिंत्रे,आदीनाथ देवडकर,राजू लोहार,प्रवीण देवडकर,दिगंबर शिंत्रे,संकेत शिंत्रे,बबलू लोंढे,शुभम पाटील यासह अनेक युवकांनी डोंगराकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले
पक्षांचे किंचाळणे कानठळया बसविणारे
दुपारची वेळ असल्यामुळे आगीने रुद्र रुप धारण केले होते.मोठमोठी झाडेही भक्षस्थानी पडत होती.त्यामुळे जंगलातील पक्षी घरटे सोडून सैरभैर झाले होते.यावेळी पक्षांचे किंचाळणे कानठळया बसविणारेच असल्याचे युवकांनी सांगितले.
डोंगर,जंगलांना आग लावणार्यांचा शोध घेवून कठोर कारवाई करावी. तसेच, वनराई सभोवती खंदक खोदण्यासह विविध उपाययोजना कराव्यात.
अमर पाटील,
वनमित्र,सोनगे