निपाणीत टेक्स्टाईल कारखान्याला आग, ७ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:06+5:302021-06-04T04:20:06+5:30
निपाणी : जत्राट श्रीपेवाडी रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहत येथील कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत ७ कोटींपर्यंत नुकसान झाल्याचा ...
निपाणी : जत्राट श्रीपेवाडी रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहत येथील कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत ७ कोटींपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी रात्री उशिरा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. वत्सला टेक्सटाईल, महादेवी टेक्सटाईल, स्नेहा टेक्सटाईल, पार्वती टेक्सटाईल, यशोदा टेक्सटाईल व दिलीप टेक्सटाईल या कारखान्यांचे आगीत नुकसान झाले. तयार कापड व यंत्रसामग्री जळून सात कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतमधील बहुतांशी कारखाने सध्या लॉकडाऊन असल्याने बंद आहेत. या वसाहतीमध्ये कोल्हापूर येथील रमेश चव्हाण बंधू यांचा कारखाना आहे. सध्या तो बंद होता, पण कारखान्यात यंत्रसामग्री व तयार कापड होते. बुधवारी मध्यरात्री अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन कारखान्यात आग लागली. वर्दळ कमी असल्याने आग लागल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही, पण पहाटेच्या वेळी धूर पाहून ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी याची माहिती उपस्थितांनी अग्निशामक दलास व कारखान्याचे मालक रमेश चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण गुरुवारी सकाळपर्यंत ही आग धुमसत होती.
या आगीत प्राथमिक अंदाजानुसार ७ कोटींपर्यत नुकसान झाले आहे. दरम्यान, औद्योगिक वसाहतीत महिनाभरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर अनेक कारखानदारांनी भेट देऊन पाहणी केली.
फोटो श्रीपेवाडी : येथील कारखान्याला भीषण आग लागून करोडोंचे नुकसान झाले.