कागलमध्ये आता माघारीचे अग्निदिव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:09+5:302021-01-02T04:21:09+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : किती वर्षे आम्ही मागेच राहायचे.. आमची भावकी मोठी आहे. प्रत्येक वेळी आमच्यावरच अन्याय का ...
दत्ता पाटील म्हाकवे : किती वर्षे आम्ही मागेच राहायचे.. आमची भावकी मोठी आहे. प्रत्येक वेळी आमच्यावरच अन्याय का ? आता काहीही झाले तरी माघार नाही. गटाने नाही दिली तरी अपक्ष उभा राहणार,, असा आक्रमक पवित्रा घेत अनेकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नेते अर्जदारांची मनधरणी करत आहेत. त्यांना विविध आश्वासनेही दिली जात आहेत. काही ठिकाणी सक्रिय कार्यकर्त्यांकडून अर्जदारांसमोर पायघड्या घातल्या जात आहेत. त्यामुळे अर्ज माघारीचे दिव्य पार करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
कागल तालुक्यात प्रत्येक निवडणूक ही चुरशीने लढविली जाते. आता ५३ ग्रामपंचायतींसाठी तब्बल २ हजार ६७५ जणांनी इच्छुक आहेत. त्यामुळे बंडोबांना थंड करून सरस आघाडी करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी वरिष्ठ नेतेमंडळींकडून फोन करून इच्छुकांना माघारीसाठी तयार केले जात आहे. अनेकांना संधी देण्यासह नोकरीचीही आश्वासने दिली जात आहेत.
चौकट-
अतिआत्मविश्वास नडल्याची चुटपुट...
बेनिक्रे येथील मंडलिक गटाकडून अर्ज दाखल केलेल्या दौलतबी बादशहा देसाई यांचा अर्ज अवैध ठरला. मात्र, या आघाडीकडून डमी अर्ज दाखलच न केल्याने राजे गटाच्या अश्विनी पांडुरंग गुरव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. छाननीतून अर्ज निघणार नाही हा अतिआत्मविश्वास नडल्याची चुटपुट या गटाला लागली आहे तर सर्वाधिक १३६ अर्ज आलेल्या म्हाकवे, बानगे येथे परस्पर उमेदवारांबाबत आक्षेप न घेता कोणत्याही उमेदवाराशी लढाईची तयारी दाखविली.
प्रचारालाही गती...
छाननीत वैध ठरलेल्या आणि स्थानिक पातळीवर युत्या निश्चित होऊन प्रभागनिहाय उमेदवार निश्चित झालेल्या उमेदवारांकडून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. संबंधित उमेदवार आपपल्या प्रभागांत फिरत आहेत.