प्रदूषणविरहितच फटाके वाजवता येणार : रात्री सात ते नऊपर्यंतच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:45 PM2020-11-12T15:45:28+5:302020-11-12T15:48:20+5:30
GreenCracaers, collector, kolhapur राष्ट्रीय हरित लवादाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत केवळ प्रदूषणविरहित फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांमध्ये हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या आदेशाचे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत केवळ प्रदूषणविरहित फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांमध्ये हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या आदेशाचे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
दिवाळी सणाला नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनादिवशी (म्हणजे यंदा शनिवारी) पहाटे व सायंकाळनंतर सर्वाधिक फटाके वाजवले जातात; परंतु या आदेशामुळे पहाटे फटाके वाजविण्यावर बंधन आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी प्रदूषण रोखण्यात मदत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री व त्यांच्या वापराबाबत हरित लवादाने आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये फक्त विनाआवाजाच्या व प्रदूषणविरहित फटाक्यांची विक्री करण्यास व फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हे फटाके सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोडता येतील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास व्यक्ती व संस्थेवर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
प्रदूषणनियंत्रित फटाके
फूलबाजे, कुंडी, पाऊस, भुईचक्कर, पेन्सिल, नागगोळी, लसूणबॉम्ब, चुटपूट, आपटबार, केपा, रॉकेट.
कोल्हापुरातील बदल
गेल्या काही वर्षांतील प्रबोधनामुळे दिवाळीला लोकांनी स्वत:हूनच फटाके वाजविणे कमी केले आहे. फटाक्यांच्या किमती व त्यातून होणारे प्रदूषण विचारात घेऊन हे प्रमाण कमी झाले ही चांगलीच बाब आहे. यंदा चायना मेड फटाके बंद झाले आहेत.