शिरोली दुमाला येथे हवेत गोळीबार
By admin | Published: June 4, 2014 12:07 AM2014-06-04T00:07:26+5:302014-06-04T00:07:48+5:30
एकास अटक : सामाईक भिंतीवरुन वाद
कोल्हापूर : सामाईक भिंतीच्या कारणावरून शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे आज, मंगळवारी सकाळी हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाटील (वय ३४, रा. शिरोली दुमाला) याला रात्री उशिरा अटक केली. त्याच्याजवळील ०.३२ चे रिव्हॉल्व्हर, बंदुकीची गोळी पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, हे प्रकरण आपापसांत मिटवण्यात आले होते. परंतु, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना दिले होते. त्यानुसार ढोमे यांनी गुन्हा दाखल केला. राहुल हा ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांचा पुतण्या आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिरोली दुमाला येथील तुकाराम नारायण पाटील व दत्तात्रय सदाशिव पाटील या दोघा चुलत भावांत गेल्या काही वर्षांपासून सामाईक भिंतीवरून वाद सुरू आहे. आज या वादातून रागाच्या भरात तुकाराम पाटील यांचा मुलगा संशयित राहुल याने घरातून रिव्हॉल्व्हर आणून हवेत गोळीबार केला. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, पोलीस निरीक्षक ढोमे यांना मोबाईलवरून निनावी फोन आला. ते स्वत: पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह घटनास्थळी गेले. त्यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली, पण त्यांना गावात असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले. त्यांनी हा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना कळविला. त्यानंतर शर्मा यांनी योग्य तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिवसभर पोलिसांनी तपास करून रात्री संशयित राहुल पाटील याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३० नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली व त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हर जप्त केले. राहुल पाटील याने २०१० साली या रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक पी. के. ताटे यांनी दिली. (प्रतिनिधी) राजकीय नेत्यांचे फोन हे प्रकरण मिटविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांचे फोन पोलीस निरीक्षक ढोमे यांना आले, पण पोलिसांनी यांना न जुमानता संशयितावर गुन्हा दाखल केला. दिवसभर करवीर पोलीस ठाण्यात काही राजकीय नेते थांबून होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नेत्यांनी काढता पाय घेतला. दोघांचे जबाब शिरोली दुमालातील घटनेनंतर पोलिसांनी तुकाराम पाटील व दत्तात्रय पाटील यांचे जबाब घेतले. त्यांनी धक्काबुक्की झाल्याचे, तसेच असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे, असे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सांगितले.