पंढरपूरच्या तरुणावर सांगलीत गोळीबार
By admin | Published: February 5, 2017 01:21 AM2017-02-05T01:21:21+5:302017-02-05T01:21:21+5:30
भरदिवसा थरार : नेम चुकल्याने बचावला; सहाजणांचे कृत्य; संशयित फरार
सांगली : पंढरपूर (जि. सोलापूर) येथील अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय २२) या तरुणावर सहाजणांच्या टोळीने दुचाकीवरून पाठलाग करून गोळीबार केला. कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे गोवर्धन चौकात शनिवारी दुपारी बारा वाजता ही थरारक घटना घडली. संशयितांचा नेम चुकल्याने सुरवसे सुदैवाने बचावला. परिसरातील लोकांनी गर्दी करताच संशयितांनी पलायन केले. त्यांच्या शोधासाठी शहरात तातडीने नाकाबंदी करण्यात आली होती.
बबलू सुरवसे गेल्या दोन वर्षांपासून दत्तनगर येथे मामाकडे राहतो. त्याच्या मामांचा कर्नाळ रस्त्यावर बांबू विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी तो मामांकडे गेला होता. तेथून तो दुचाकीवरून कामानिमित्त सांगलीत येत होता. मित्राचा मोबाईलवर फोन आल्याने तो दुचाकी चालवितच मोबाईलवर बोलत येत होता. गोवर्धन चौकात आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने दोन दुचाकीवरून सहा संशयित आले. त्यांना पाहून बबलूने दुचाकीचा वेग आणखी कमी केला. संशयितांनी दुचाकी आडवी मारून त्याला थांबविण्यास भाग पाडले. त्यावेळी एका दुचाकीवरील संशयिताने कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर काढून बबलूच्या दिशेने गोळीबार केला. प्रसंगावधान ओळखून बबलू बाजूला सरकल्याने संशयितांचा नेम चुकला. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील संशयिताने बबलूच्या दुचाकीला धडक दिली. या प्रकारामुळे बबलू घाबरला. त्याने स्वत:ची दुचाकी संशयितांच्या अंगावर ढकलून पलायन केले. या झटापटीत संशयित दुचाकीवरून रस्त्यावर पडले.
गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोकांनी गर्दी केली. बबलूला लोक ओळखत असल्याने सर्वांनी त्याला गराडा घातला. लोकांची गर्दी होताच संशयित पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक अनिल गुजर, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. बबलूलाही सोबत घेतले होते. त्याच्याकडून संशयितांनी (पान १० वर)
‘एलसीबी’कडे तपास
बबलू सुरवसे याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाकडे सोपविला आहे. या विभागाचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. बबलूकडे चौकशी करून संशयितांचे वर्णन, त्यांनी कोणत्या दुचाकी वापरल्या होत्या, याची माहिती घेतली जात आहे. पंढरपुरात त्याचा कोणाशी वाद झाला होता का, याबद्दल चौकशी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत याचे कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते.
सांगलीत शुक्रवारी पंढरपूरच्या तरुणावर गोळीबार झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.