राज्यात पहिले कृषी भवन कोल्हापुरात उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:15 AM2019-01-28T00:15:32+5:302019-01-28T00:15:36+5:30
कोल्हापूर : राज्यातील पहिले अद्ययावत कृषी भवन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ...
कोल्हापूर : राज्यातील पहिले अद्ययावत कृषी भवन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केली. तीन एकर जागेत हे भवन उभारले जाणार असून, त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकरी खातेदारांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. येत्या दोन महिन्यांत डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन सातबारा देण्याचे काम मार्गी लागेल. त्याचबरोबर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये घटनेच्या चौकटीत टिकणारे १६ टक्के आरक्षण दिल्यामुळे समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी मोठी मदत होईल.
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
पालकमंत्र्यांच्या
हस्ते गुणगौरव
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्टÑपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक सतीश माने, सहायक फौजदार मनोहर खानगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील तसेच गुणवंत खेळाडू अभिज्ञा पाटील, अनुष्का पाटील, शाहू माने, दिव्यांग खेळाडू उज्ज्वला चव्हाण, अजय वावरे, गगन देशमुख,पंडित पांडे, कुमार ऋत्विक चौगले यांचा सन्मान करण्यात आला.