प्रथमोपचाराची टिश्श्यू टॅब्लेट, जिओथर्मल एनर्जी..
By admin | Published: December 24, 2014 09:47 PM2014-12-24T21:47:19+5:302014-12-25T00:17:10+5:30
विद्यापीठात आविष्कार महोत्सव : मध्यवर्ती संशोधन महोत्सव २ जानेवारीला
कोल्हापूर : प्रथमोपचाराची टिश्श्यू टॅब्लेट, जिओथर्मल एनर्जीचा वापर, घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या विविधांगी संशोधनाचे दर्शन आज, बुधवारी शिवाजी विद्यापीठात घडले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संशोधनविषयक आविष्कार महोत्सवात नवकल्पना मांडल्या.
विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार २०१४-१५’ संशोधन प्रकल्प स्पर्धा रसायनशास्त्र विभागात झाली. यात सातारा कॉलेज आॅफ फार्मसीच्या मनोज मुळीक व श्रद्धा कुंभार यांनी ‘टिश्श्यू टॅब्लेट’चा प्रकल्प सादर केला. यात प्रवासादरम्यानच्या अपघातात एखादी जखम झाल्यास त्यावर तातडीने प्रथमोपचारासाठी हळद आणि टिश्श्यूपेपरपासून बनविलेली टॅब्लेट त्यांनी सादर केली. ही टॅब्लेट पाण्यात टाकल्यानंतर १५ सेकंदांत एखाद्या बँडेजपट्टीसारखी तयार होते. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील सतीश कुंभार याने ग्रीन हाउस, ग्लोबल वॉर्मिंग, घटता ओझोन रोखण्यासाठीचा प्रकल्प मांडला. त्यातून त्याने सध्याचे वास्तव दाखविले. साताऱ्यातील भाग्यश्री सुर्वे हिने ‘जिओथर्मल एनर्जी’चा विविधांगी वापर दाखविला. शोधनिबंधातून सांगलीतील शिराळा तालुक्याची बोली, मुला-मुलींमधील अंधश्रद्धेचा तुलनात्मक अभ्यास, मोडी लिपी, शिक्षणात होणारा सोशल नेटवर्किंगचा वापर, कोल्हापुरातील घटत्या लिंग गुणोत्तरातून वास्तव मांडले. संशोधनाचा ‘आविष्कार’ पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. मध्यवर्ती संशोधन महोत्सव
२ जानेवारी २०१५ रोजी विद्यापीठात होणार आहे.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. सावंत यांच्या हस्ते ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’चे उद्घाटन झाले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, डॉ. ए. एम. गुरव, आदी उपस्थित होते. डॉ. एम. ए. अनुसे यांनी स्वागत केले. डॉ. आर. एस. साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)