‘बिद्री’ला तांत्रिक कार्यक्षमेचा प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:08+5:302021-01-09T04:19:08+5:30
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा- वेदगंगा सह. साखर कारखान्यास सन २०१९-२० वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट ...
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा- वेदगंगा सह. साखर कारखान्यास सन २०१९-२० वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. या पुरस्काराने ‘बिद्री’ची साखर कारखानदारीतील कार्यक्षमता पुन्हा सिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
बिद्री साखर कारखान्यास २०१९- २० च्या गळीत हंगामास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अव्वल नामांकनाचा प्रथम दर्जाचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेच्या पुरस्कार मिळाला. बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, कारखान्यांशी संलग्न सर्व घटकांचे योगदान पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केल्याने ‘बिद्री’च्या सहकाराला मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे, असे ते म्हणाले.
के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री’स २०१९-२० गळीत हंगामात गाळप उतारा १२.८५ टक्के, गाळप, क्षमता वापर ११४.२७ टक्के, गाळप, क्षमतेच्या वापरामध्ये १३.११ टक्क्याने वाढ, बंद वेळेचे प्रमाण १.९८ टक्के रिड्यूस्ट मिल एक्स्द्रॅक्शन ९५.६३ टक्के, रिडयूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी ८७.६८ टक्के असे सर्वोत्कृष्ट रिझल्ट कार्यक्षमतेत सिद्ध झाल्याने बिद्रीस दक्षिण विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. बिद्री कारखाना प्रगतीच्या एका उत्तुंग टप्प्यावर मार्गक्रमण करीत आहे. सहवीज प्रकल्पासारखा उभा राहिलेला प्रकल्प त्यातून निर्माण झालेले आर्थिक स्रोत सहकारातील पारदर्शी कारभार उत्कृष्ट नियोजन, साखर कारखानदारी अभ्यास अशी अनेक गुणवैशिष्ट्यांमुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सह. साखर उद्योगावर या पुरस्काराने ‘बिद्री’चा आदर्श प्रेरणा देणारा ठरणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, संचालक मंडळ उपस्थित होते.
........ फोटो १)अध्यक्ष के. पी. पाटील २) कारखाना संग्रहित छायाचित्र