आधी आचारसंहिता; मगच स्पर्धांना परवानगी - अभिनव देशमुख : ‘फुटबॉल’साठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:24 AM2019-06-13T01:24:22+5:302019-06-13T01:25:00+5:30
सोळा संघ आणि के. एस. ए. यांच्यात ठोस कडक आचारसंहिता ठरवा. दंगा करणाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार हे ठरवा आणि शुल्क भरून बंदोबस्त घ्या,
कोल्हापूर : सोळा संघ आणि के. एस. ए. यांच्यात ठोस कडक आचारसंहिता ठरवा. दंगा करणाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार हे ठरवा आणि शुल्क भरून बंदोबस्त घ्या, तरच फुटबॉल स्पर्धांना परवानगी देऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस
अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
स्थानिक फुटबॉल पुन्हा सुरू व्हावा याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी सायंकाळी संयोजक व पोलीस प्रशासनात बैठक झाली यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, फुटबॉलला हुल्लडबाजीचे ग्रहण लागले आहे. हा खेळ बंद पडणे दुर्दैवी आहे. त्यामुळे नवोदित फुटबॉलपटूंचे नुकसान होत आहे. हुल्लडबाजी करणाºया खेळाडूंवर संयोजकांनी काय कारवाई केली हे सांगावे, दंगा करणाऱ्यांची जबाबदारी संयोजकांनी स्वीकारावी, यात के. एस. ए. व संघांनी आदर्श आचारसंहिता ठरवावी, प्रत्येक पोलीस कर्मचाºयांमागे सतराशे रुपये इतके शुल्क भरावे, त्यानंतर के.एस.ए. संघ, व्यवस्थापन, आदींनी दंगा होणार नाही याची हमी घ्यावी. त्यानंतरच स्थानिक फुटबॉल स्पर्धांना परवानगी देऊ. दरम्यान, उपस्थित असलेल्या संघांच्या प्रतिनिधींनी आम्हाला आचारसंहिता मिळालेली नाही, असे सांगितले.
त्यावर डॉ. देशमुख म्हणाले, आदर्श आचारसंहिता ठोस ठरवा आणि मगच पुढील बैठकीस यावे. त्यानंतरच परवानगी द्यायची की नाही हे ठरवू. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनीही सर्वच घटकांंनी जबाबदारी घेतल्याशिवाय पुन्हा फुटबॉल सुरू होणार नाही. तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी प्रेक्षक गॅलरीला जाळी मारून घ्यावी असेही सुचविले. यावेळी के.एस.ए.चे मानद सचिव माणिक मंडलिक, सहसचिव राजेंद्र दळवी, फुटबॉल सचिव प्रा. अमर सासने, बाळासाहेब निचिते, संयोजकांतर्फे सतीश सूर्यवंशी, संघांतर्फे रमेश मोरे, अमर पाटील, पप्पू नलवडे, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.
असे सुनावले : गेल्या दोन वर्षांपूर्वी हुल्लडबाजीमुळे फुटबॉल स्पर्धा बंद पडली होती. त्यानंतर या स्पर्धा कडक आचारसंहिता लागू करून सुरू करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा हुल्लडबाजी करीत दंगा झाला. या दरम्यान, संयोजकांनी किती खेळाडू आणि संघांवर काय कारवाई केली याबद्दलची सर्व माहिती पुढील बैठकीत घेऊन यावी. केवळ फुटबॉल सामन्यांना बंदोबस्त देण्याइतकेच काम पोलिसांना आहे का, असा सवाल पोलीस अधीक्षक देशमुख यांनी उपस्थितांना केला.