पहिल्या दिवशी ४७०० जणांनी दिली परीक्षा शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू;
By admin | Published: May 5, 2017 11:06 PM2017-05-05T23:06:08+5:302017-05-05T23:06:08+5:30
‘एम. एस्सी केमिस्ट्री’ला सर्वाधिक परीक्षार्थी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना शुक्रवारी सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी १८ अभ्यासक्रमांसाठी ४७८९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. त्यात सर्वाधिक ३४१८ परीक्षार्थी हे ‘एम. एस्सी केमिस्ट्री’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसले होते. एम. ए. अथवा एम. एस्सी. (भूगोल), मास कम्युनिकेशन, एम. एस्सी. (केमिस्ट्री), बी.जे.सी., एम.जे.सी., एम. एस्सी. अॅग्रो केमिकल्स अॅन्ड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. भाषेच्या (विद्याशाखा बदल) अन्य शाखांच्या परीक्षा शुक्रवारी झाल्या. त्यासाठी ५४३३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली. त्यापैकी ४७८९ जणांनी परीक्षा दिली, तर ६४४ परीक्षार्थी गैरहजर होते. या परीक्षांसाठी विद्यापीठातील ग्रंथालय इमारत, मानव्यशास्त्र इमारत आणि रसायनशास्त्र विभाग आणि सायबर, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सांगलीतील वालचंद कॉलेज ही केंद्र होती. सकाळी साडेनऊ ते साडेदहा, सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा, दुपारी एक ते अडीच आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा सत्रांमध्ये परीक्षा झाली. त्यातील एम. एस्सी. केमिस्ट्री अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ३७३६ जणांनी नोंदणी केली होती. त्यातील ३४१८ जणांनी परीक्षा दिली, तर ३१८ अनुपस्थित राहिले. अन्य अभ्यासक्रमांच्या तुलनेत या परीक्षेसाठी सर्वाधिक परीक्षार्थी होते. या परीक्षांमुळे विद्यापीठ आणि परीक्षा केंद्रांचा परिसर गर्दीने फुलला होता. दरम्यान, यावर्षी विविध अभ्याक्रमांच्या ३९ परीक्षा होणार आहेत. त्याची सुरुवात आजपासून झाली. पहिल्या दिवशीचा परीक्षा सुरळीत पार पडल्या असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ................................................................. प्रवेशपत्रावर बैठक क्रमांक नसल्याने गोंधळ काही परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर बैठक क्रमांकाची छपाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. त्याची माहिती मिळताच परीक्षा विभागाने ‘नेमलिस्ट समरी’द्वारे बैठक क्रमांक उपलब्ध करून दिले. ............................................................... आज होणाऱ्या परीक्षा बी. लिब. सायन्स अॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब. सायन्स अॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अॅन्ड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अॅन्ड इन्फर्मेटिक्स या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने आज, शनिवारी होतील. ....................................................................... (संतोष मिठारी)