पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली प्रथम एज्युकेशन संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:58+5:302021-08-02T04:09:58+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये आंबेवाडी या गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व कोल्हापूर ...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये आंबेवाडी या गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व कोल्हापूर प्रगती शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पूरग्रस्त लोकांच्या दुचाकी,चार-चाकी मोफत दुरुस्ती करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
महापुरामुळे पूरग्रस्त भागात घरोघरी पाणी आले. यामध्ये पुराच्या पाण्यामुळे चार चाकी, दुचाकी, घरगुती इलेक्ट्रिकल साहित्य खराब झाले होते.
या गावात प्रत्यक्ष जाऊन ५० दुचाकी गाड्या व २० चार चाकी गाड्याची मोफत दुरुस्ती केली, या मध्ये इंजीन ऑईल बदलणे, कार्बोरेटर्सची साफसफाई, एअर फिल्टर आणि फ्यूल चेकअप ही कामे करण्यात आली. तसेच ५६ घरात इलेक्ट्रिकलची सेवा जसे की स्विच बोर्ड साफ करणे आणि खराब झालेले स्विच बदलणे, काही घरगुती उपकरणे दुरुस्ती करणे हे काम करण्यात आले.
या कार्यात ऑटोमोटिव्ह टीममधून किरण बुगडे व प्राजक्ता देसाई तसेच इलेक्ट्रिकल टीममधून वैभव कोरे व ओंकार शेंडगे या प्रशिक्षकाच्या सोबत माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. पूरग्रस्तांना गावागावात सेवा देण्यासाठी कार्यक्रम समन्वयक औदुंबर मांगले याचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.तर प्रथम संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख व कोल्हापूर प्रगती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भदरगे यांच्या प्रेरणेने हे उपक्रम लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
चौकट:
महापुरात अनेकांचे संसार व घरे वाहून गेले आहेत. अनेकांच्या गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. या सर्व पूरग्रस्तांना जनसेवेची मदत व्हावी त्यांना जाग्यावर सेवा देण्यासाठी आमची टीम पूरग्रस्त भागात विनामूल्य काम करत सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.
सुधाकर भदरगे
अध्यक्ष
प्रगती शिक्षण मंडळ
चौकट:
माझी दुचाकी पुराच्या पाण्यात होती,ती नादुरुस्त झाल्याने गॅरेजवाल्याने १५ हजार खर्च सांगितलं होता. एवढे पैसे जमवणे शक्य नव्हते. मग गावामध्ये ही मोफत सेवा असल्याचे समजले आणि गाडी दुरुस्तीसाठी दिली. मोफत कामे झाल्याने समाधान लाभले.