यड्राव औद्योगिक वसाहतीत राज्यातील पहिला दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:40+5:302021-06-03T04:17:40+5:30
घनश्याम कुंभार यड्राव : पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा दवाखाना सुरू झाल्याने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक ...
घनश्याम कुंभार
यड्राव : पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा दवाखाना सुरू झाल्याने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक वसाहती व परिसरातील कामगार व त्यांच्या कुटुंबांतील ६५ हजार सदस्यांना याचा लाभ मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झालेला हा दवाखाना राज्यामध्ये पहिला ठरला आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नाला यश आल्याने समाधान होत आहे.
इचलकरंजी येथे असलेल्या राज्य कामगार विमा दवाखान्यावर शिरोळ व हातकणंगले उद्योग क्षेत्रातील २८ हजार कामगार व त्यांच्यावर अवलंबून सुमारे ८४ हजार कुटुंबीयांचा भार सहन करावा लागत होता. या परिसरात दवाखाना सुरू झाल्याने शिरोळ तालुक्यातील पार्वती औद्योगिक वसाहत, ल. क़. अकिवाटे, शाहू औद्योगिक वसाहत, हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत या औद्योगिक वसाहतींसह इतर उद्योगांतील कामगार व त्यांचे कुटुंबीय असे अंदाजे ६५ हजार व्यक्तींना या दवाखान्याचा लाभ होणार आहे. या योजनेमधून मोफत उपचारांसह अपघात झाल्यास ९० टक्के पगार, महिलांना बाळंतपण सहा महिने रजा, कायम अपंगत्व आल्यास पेन्शन, कामावर असताना मृत्यू झाल्यास ९० टक्के प्रमाणे वारसांना पेन्शन, असाध्य आजारासाठी दोन वर्षे पगारी रजा व उपचार अशा सुविधा मिळतात.
सध्या या योजनेअंतर्गत इचलकरंजी येथे निरामय हॉस्पिटल, जयसिंगपूर येथे माने हेल्थकेअर व सरस्वती हॉस्पिटल या दवाखान्यांमध्ये उपचाराची सोय आहे. तर इचलकरंजी परिसरातील आणखी मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल या योजनेची संलग्न करण्यात येणार असल्याने कामगारांना अत्याधुनिक उपचार मिळण्याची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. येथील दवाखान्यांमध्ये दहा आयसीयू युनिट व दहा जनरल बेडची सुविधा करून लवकरच सुसज्ज हॉस्पिटल बनविण्यात येणार आहे.
------------------------
जिल्ह्यातील चार औद्योगिक वसाहतींचा समावेश
राज्यामध्ये कामगार विमा सोसायटीच्या १०० दवाखान्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील पार्वती वसाहत, कागल एमआयडीसी, शिनोली औद्योगिक वसाहत चंदगड व शिरोली एमआयडीसी या औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे.
फोटो - ०२०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा दवाखान्याच्या प्रारंभप्रसंगी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय पाटील-यड्रावकर, प्रकाश अकिवाटे, शामराव कुलकर्णी, शेखर चौधरी उपस्थित होते.