कोल्हापुरात उभारणार पहिले इनडोअर स्टेडियम, १० कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 11:27 AM2022-05-09T11:27:42+5:302022-05-09T19:10:08+5:30
कोल्हापुरातील सर्व प्रकारचे खेळ जूनमध्ये पाऊस सुरू झाला की बंद पडतात. पुन्हा खेळ सुरू होण्यास आक्टोबर, नोव्हेंबर महिना उजाडतो; पण इनडोअर स्टेडियम झाल्यावर पावसाळ्यात देखील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर : क्रीडा क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या कोल्हापूर शहरात पहिले इनडोअर स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितली. या स्टेडियमकरिता नगरविकास विभागाकडून मूलभूत सोई सुविधांचा विकास कार्यक्रमांतर्गत १० कोटींचा निधीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
या नियोजित इनडोअर स्टेडियमकरिता कोल्हापूर शहर परिसरात साधारणपणे पाच एकर जागा लागणार आहे. शेंडा पार्क किंवा हॉकी स्टेडियम लगतच्या आयटी पार्क जवळील जागेची पाहणी करण्यात येत आहे. या शासकीय जागा असून लवकरच त्याचा निर्णय होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पहिलेच इनडोअर स्टेडियम कोल्हापुरात होत असल्यामुळे सर्व खेळांच्या प्रकारांना तसेच खेळाडूंना त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. कोल्हापुरातील सर्व प्रकारचे खेळ जूनमध्ये पाऊस सुरू झाला की बंद पडतात. पुन्हा खेळ सुरू होण्यास आक्टोबर, नोव्हेंबर महिना उजाडतो; पण इनडोअर स्टेडियम झाल्यावर पावसाळ्यात देखील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट वगळता अन्य सर्व खेळ स्टेडियममध्ये होतील, असे पाटील म्हणाले.
स्टेडियमची जागा निश्चित झाल्यावर त्यांचे सविस्तर आराखडे तयार केली जातील. त्यासाठी आर्किटेक्चरची नियुक्ती केली जाणार आहे. आराखडा तयार करताना तो दोन टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मंजूर निधीतील दहा कोटी खर्चाच्या कामांचा समावेश राहिल. दुसऱ्या विस्तारीत भागाचा १० कोटींचा आराखडाही तयार केला जाणार आहे. आराखडे तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे ही कामे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत केली जातील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात होणारे इनडोअर स्टेडियम म्हणजे स्थानिक खेळाडूंना पर्वणी असेल. पावसाळ्यात खेळाडूंचे सराव बंद होतात. त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर परिणाम होतो. या स्टेडियममुळे वर्षभर खेळाडू तंदुरुस्त राहू शकतात, असे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार जयश्री जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी उपमहापौर संजय मोहिते उपस्थित होते.
२५ टक्के हिस्सा महापालिकेचा
इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटींचा निधी मंजूर झाला असून प्रकल्पाअंतर्गत कार्यन्वयन यंत्रणा महानगरपालिका राहणार आहे. या प्रकल्पासाठी ७५ टक्के खर्च हा राज्य सरकारचा तर २५ टक्के खर्च हा महानगरपालिकेचा राहणार आहे.