‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या वादात सरकारची उडी, पहिली स्पर्धा कोल्हापुरातच; दीपाली सय्यद यांची माहिती
By राजाराम लोंढे | Published: March 20, 2023 04:05 PM2023-03-20T16:05:55+5:302023-03-20T16:33:54+5:30
हीच असेल अधिकृत स्पर्धा
कोल्हापूर : राज्य शासनाच्या मान्यतेने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व अस्थायी कुस्ती समितीच्या पुढाकाराने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापुरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा होत असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक व सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. हीच अधिकृत स्पर्धा असेल, असेही त्यांनी सांगितले.
दीपाली सय्यद म्हणाल्या, पुरुषांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा गेली ६५ वर्षे सुरू आहे. मात्र, याच धर्तीवर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी व या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाबरोबरच शासकीय नोकरीची संधी मिळावी यासाठी माझा प्रयत्न आहे. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली असून, सुरुवातीच्या काळात ही स्पर्धा कोठे घ्यायची याबाबत जरी वाद असला तरी हा वाद मिटला आहे. राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी कुस्ती समिती मिळून कोल्हापुरात ही ऐतिहासिक स्पर्धा घेत आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, साधारणता २५ एप्रिलपासून ही स्पर्धा घेण्याचा आमचा मनोदय आहे. कोल्हापूरला साजेल असे विजेत्यांना बक्षीस दिले जाईल. राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला चालना दिली, या कुस्ती पंढरीत ही स्पर्धा होत असल्याचा आनंद आहे.
जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, या स्पर्धेबाबत काही वाद असला तरी राज्य कुस्तीगीर परिषदेसोबत चर्चा झाली असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण आदी उपस्थित होते.