आधी मूर्तीवर नागचिन्ह घडवा
By admin | Published: June 14, 2016 11:41 PM2016-06-14T23:41:55+5:302016-06-15T00:01:55+5:30
शरद तांबट : देवीचे मूळ स्वरूप बदलून विकासाला अर्थ नाही
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्याआधी देवीची अपूर्ण मूर्ती पूर्ण केली पाहिजे. आॅगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेत मूर्तीवर नागचिन्ह घडवायचे राहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका, निवेदने, आंदोलन होऊनदेखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला गेलेला आहे. याबद्दलचा संताप आजही कोल्हापूरच्या भाविकांमध्ये असून त्याचा उद्रेक होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. देवीचे मूळ स्वरूप बदलून केलेल्या विकासाला काहीच अर्थ नाही. कोट्यवधी रुपये खर्चून विकास आराखडा करण्यापूर्वी सर्वांत आधी नागचिन्ह घडविले जावे.
परगावहून येणाऱ्या भक्तांपुढे प्रश्न असतो तो पार्किंगचा. ही व्यवस्था कपिलतीर्थ मार्केटमध्ये करता येईल. येथे मल्टीलेव्हल पार्किंग, देवस्थान समितीचे कार्यालय, पोलिस नियंत्रण कक्ष, बँक अशा सोयी निर्माण करता येतील. या इमारतीच्या टेरेसवर हेलिपॅड केल्यास व्ही.आय.पीं.ना थेट मंदिरापर्यंत जाता येईल. पोलिस व प्रशासनाची तारांबळ कमी होईल. कपिलतीर्थ मार्केट सरस्वती टॉकीज परिसरात हलविता येणे शक्य आहे. कावळा नाका ते गंगावेश या मार्गावर उड्डाणपूल केल्यास परस्थ भाविक कोणालाही न विचारता मंदिरापर्यंत पोहोचू शकतील.
अंबाबाई मूर्तीसह मंदिराचे मूळ रूप कायम ठेवावे. त्याला तडा जाऊ देता कामा नये. मंदिरातील पाय भाजणाऱ्या फरशा काढून टाकल्या जाव्यात. मंदिराच्या परिसरात कोणकोणत्या ठिकाणी अन्य देवादिकांची मंदिरे आहेत, त्याची कल्पना भाविकाला यावी यासाठी नकाशारूपात माहिती द्यावी. मंदिरात २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय असावी. मंदिराबाहेर प्रसाधनगृहाची व्यवस्था चांगल्या पद्धतीची असावी.
- शरद तांबट
सामाजिक कार्यकर्ते
ओंगळवाणे प्रदर्शन
कोणत्याही दरवाजाने मंदिरात जा; प्रत्येक ठिकाणी आवळे, चिंचा विकणारे लोक, फेरीवाले बसून ओंगळवाणे प्रदर्शन करतात. त्यात भर चपलांची. प्रत्येक दरवाजाबाहेर भला मोठा चपलांचा ढीग लागलेला असतो. इतस्तत: विखुरलेल्या चपला, कचराकुंडी, विक्रेते या सगळ्यांमुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. विक्रेत्यांना स्वतंत्र जागा देण्यात यावी आणि चप्पल स्टॅँडची योग्य सोय व्हायला हवी. यांचे प्रदर्शन मंदिराच्या दर्शनी भागात नकोच.