मराठी माध्यमाची पहिली ई-लर्निंग शाळा: नेहरूनगर विद्यामंदिर शाळा क्रमांक ६१-गुणवंत विद्यामंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:57 PM2019-04-20T12:57:51+5:302019-04-20T13:00:00+5:30
महापालिका शाळांमध्ये गैरसोर्इंचा सुकाळ आणि विद्यार्थ्यांचा दुष्काळ अशी परिस्थिती असताना नेहरूनगर विद्यामंदिर शाळा क्रमांक ६१ मात्र अपवाद ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्यासाठी शाळेच्या
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : महापालिका शाळांमध्ये गैरसोर्इंचा सुकाळ आणि विद्यार्थ्यांचा दुष्काळ अशी परिस्थिती असताना नेहरूनगर विद्यामंदिर शाळा क्रमांक ६१ मात्र अपवाद ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून एक लोकचळवळच निर्माण झाली. त्यातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन नव्याने घडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाची पहिली ई -लर्निंग शाळा होण्याचा मान ही या विद्यामंदिरला मिळाला आहे.
आयसोलेशन हॉस्पिटलनजीक असलेली महानगरपालिकेची शाळा १९७२ साली केवळ ३२ विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. शाळेमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी येथील शिक्षकांनी व शाळेच्या कर्मचारी वर्गाने हे शिवधनुष्य पेलले. महानगरपालिकेच्या शाळांना उतरती कळा लागली असतानाच परिसरात शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करून, मुलांना शाळेत पाठवा, अशी पालकांना विनवणी करण्यापासूनची सुरुवात होती. त्याला स्थानिकांची अनमोल साथ मिळाल्याने शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने सुरुवात केली.
शाळेत नवीन इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी, मैदान, शौचालय, बगीचा, आदी मूलभूत सुविधा निर्माण केल्या. सर्व शिक्षा अभियान व लोकवर्गणीतून हे कार्य पार पडले. शाळेचे बाह्यरूप पालटल्याने पालक व विद्यार्थी या शाळेकडे वळू लागले. शाळेची पटसंख्या वाढून एक-एक वर्ग नव्याने निर्माण होत गेले. कालांतराने या कार्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. शाळेला मदत करणाऱ्यांचे हात समोर येत गेले. तसेच शाळेने पण यशाची नवनवीन शिखरे गाठण्यास सुरुवात केल्याने अनेक पुरस्कार शाळेने प्राप्त केले.
सध्या शाळेत मराठी व सेमी इंग्रजी असे दोन्ही माध्यम सुरू आहे. येथील उपक्रमशील शिक्षक अनिल शेलार, रामदास वास्कर, संजय पाटील, तृप्ती माने, विठ्ठल दुर्गुळे अन्य शिक्षकांमुळे शाळेत बालवाडी ते सातवीच्या वर्गाची एकूण ७५० पटसंख्या आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक शाळेला कुटुंबातील एक सदस्य समजून काम असल्याने शाळेच्या कामासाठी कधीच वेळेचे बंधन येत नाही. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा आणि विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत शाळेचे नाव उंचाविले आहे; त्यामुळेच शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच शाळेमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड यंदा पण लागला आहे.
झाडांच्या गर्दीत लपलेली शाळा
शाळेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच शाळेची भव्य इमारत गर्द झाडांमध्ये लपली आहे. मुलांना शिक्षणासोबत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत; त्यामुळे येथील वातावरण नेहमी प्रसन्न असते. शाळेमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे येथील बोअरवेलला मुबलक पाणी आहे. या झाडांना नियमित पाणी घालणे, निगा राखण्यासह परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम विष्णू देसाई, अनिल साळोखे, बाबूराव माळी हे कर्मचारी आवडीने करत असल्याने शाळेचा परिसर हिरवागार झाला आहे.
चॉकलेटला फाटा...
शाळेमध्ये मुलांच्या वाढदिवसानिमित्त पालकांना चॉकलेट वाटण्याची सक्त मनाई आहे. त्या खर्चाऐवजी तुम्ही स्वइच्छेतून एखादी वस्तू द्यावे, असे आवाहन केले आहे; त्यामुळे अनेक पालकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे शाळेत खडूचा बॉक्स, लहानशी कुंडी असे विविध साहित्य भेट देत असल्याने शाळेतील अनेक लहानसहान गोष्टींवरील खर्च मार्गी लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शाळा
पश्चिम महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची पहिली ई -लर्निंग सुविधा प्राप्त ही शाळा आहे. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत साडेसात लाखांची अद्ययावत प्रयोगशाळा या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण आणि शिस्तप्रिय विद्यार्थी घडविण्याचा शाळेचा दृष्टिकोन आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने शाळा अनेक उपक्रम राबविते. तसेच शालेय उपक्रमात पालकांचाही सहभाग उल्लेखनीय आहे. सर्वांच्या योगदानामुळे शाळेची गुणवत्तापूर्ण वाटचाल सुरू आहे.
शहाजी घोरपडे, मुख्याध्यापक
सामन्य घरातील विद्यार्थ्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थपणे अनेकांनी शाळेसाठी मदत केली आहे. शाळेतील शिक्षकांचे योगदान मोठे आहे; यासाठी आमचा हातभार लागल्याने समाधान वाटते. येथील विद्यार्थी शिष्यवृत्ती, विविध परीक्षा आणि खेळांत अव्वल ठरत आहे, हे कौतुकास्पद आहे.
दिलीप भुर्के, माजी नगरसेवक