पहिली ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ पुण्यात
By Admin | Published: July 27, 2016 12:08 AM2016-07-27T00:08:13+5:302016-07-27T00:33:03+5:30
नंदकुमार निकम : सप्टेंबरमध्ये परिषद, हजार शिक्षकांची नोंदणी
कोल्हापूर : शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्न्मेंटने पहिली नॅशनल टीचर्स काँग्रेस (एनटीसी) परिषद आयोजित केली आहे. पुणे येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात दि. २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान ही परिषद होणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील १००० शिक्षकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष निकम म्हणाले, राज्य शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन, भारतीय छात्र संसद फाउंडेशन, विश्वशांती केंद्र, युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘एनटीसी’ होणार आहे. यात देशातील पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुमारे आठ हजार शिक्षक सहभागी होतील.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड हे ‘एनटीसी’चे मुख्य समन्वयक आहेत. या पत्रकार परिषदेस माईर्स
आर्टस, कॉमर्स अॅँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. एन. मोरे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. कुचेकर, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष
डॉ. क्रांतिकुमार पाटील, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना आमंत्रण
‘एनटीसी’मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्य:स्थिती आणि भवितव्य, सध्याच्या शिक्षणपद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?, कॉर्पोरेटसाठी सीएसआर तसेच शिक्षणासाठी टीएसआर, आपण शिकवितो; ते शिकतात का?, आदी विषयांवर चर्चा होईल. यासाठी शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. यातील सहभागासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.